नागपूर : काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांच्या कार्यालयावर भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी केलेल्या कालिख फासण्याच्या घटनेने सोमवारी राजकीय वातावरण तापवले. या प्रकाराविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप नेते व माजी आमदार कृष्णा खोपडे यांच्या घरासमोर मोठ्या संख्येने धडक देत घोषणाबाजी केली.
दरम्यान, भाजपचे कार्यकर्तेही तिथे दाखल झाल्याने दोन्ही पक्ष समोरासमोर आले आणि घोषणाबाजीमुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले.
घटनेची पार्श्वभूमी अशी की, काँग्रेस आमदार वंजारी यांनी आपल्या कार्यालयाबाहेर “पूर्व नागपूर आमदार” अशी नोंद केली होती. मात्र, हे पद कृष्णा खोपडे यांच्याकडे असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. यामुळे भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी वंजारी यांच्या कार्यालयावर कालिख फासून संताप व्यक्त केला होता.काँग्रेस नेते अभिजीत वंजारी हे विधान परिषद आमदार आहे.
या कृत्याविरोधात काँग्रेसकडून लकडगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर सोमवारी सकाळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी खोपडे यांच्या घरासमोर आंदोलन छेडत घोषणाबाजी सुरू केली.
अचानक मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाल्याने दोन्ही गटांमध्ये धुसफूस निर्माण झाली. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. खोपडे यांच्या निवासस्थानासमोर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सुरक्षेसाठी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत.
या घटनेमुळे काँग्रेस-भाजपमधील संघर्ष नागपूरच्या राजकारणात चांगलाच चिघळल्याचे दिसून येत आहे