Published On : Mon, Oct 9th, 2017

दिग्गज नेत्यांच्या सभांमुळे शहरात काँग्रेसमय वातावरण

Advertisement

नांदेड: प्रचाराच्या अंतिम टप्प्यात दि. 8 व 9 रोजी सिडको, जुना मोंढा, मगनपुरा, इंदिरा गांधी मैदान, खुदबई नगर या ठिकाणी झालेल्या विराट सभांमधून काँग्रेस पक्षाच्या देशातील तीन दिग्गज नेत्यांनी शहराच्या विविध भागात विराट जाहीर सभा घेतल्या या सभांमधून राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांचे हात मजबूत करण्यासाठी काँग्रेसला समर्थ साथ द्या असे भावनिक आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.

शिवराज पाटील चाकूरकर
जलसंस्कृतीचे जनक डॉ. शंकरराव चव्हाण यांनी दोनदा राज्याचे मुख्यमंत्रीपद व केंद्रात अनेक महत्त्वाची मंत्रीपदे संभाळली. त्यांनी सामान्य जनता हाच विकासाचा केंद्रबिंदू मानला. त्यांच्यामुळे जायकवाडी, विष्णुपुरी, येलदरी, उर्ध्व पैनगंगा, अप्पर पैनगंगा विसापूर, उजनी या धरणांची निर्मिती झाली. या धरणांमधून मिळणा-या पाण्यामुळे मराठवाड्यातील शेतक-यांचे सिंचन व पिण्याचे पाणी मिळते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन खा. अशोकराव चव्हाण यांनी तितक्यात ताकतीने नांदेड जिल्ह्याच्या विकासाचे काम केले. गुरु-ता-गद्दी व जेएनयुआरएम योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांचा निधी खेचून आणला, त्यामुळे नांदेडचा चेहरा मोहरा आज बदलला आहे. भविष्यात या शहराचा विकास करण्यासाठी महानगरपालिका काँग्रेसच्या म्हणजे अशोकराव चव्हाण यांच्या हातात द्या, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कै. डॉ. शंकरराव चव्हाण व खा. अशोकराव चव्हाण यांच्यामुळे नांदेडचा सन्मान देशात वाढला आहे, हे सांगतानाच त्यांनी त्यांच्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप सरकारवर कडाडून हल्ला केला.

सुशिलकुमार शिंदे
केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार दलित व मुस्लीम विरोधी आहे. उत्तर प्रदेशमध्ये याच पक्षाने एकाही मुस्लीम व्यक्तीस उमेदवारी दिली नाही. एवढेच नव्हे तर हे सरकार अल्पसंख्याक व दलितांनी काय खावे आणि काय खाऊ नये यावर कायदे करित आहे. एवढेच नव्हे तर केवळ गायीचे मांस बाळगल्याच्या संशयावरून अल्पसंख्यांकांच्या हत्या घडविल्या जात आहेत. लोकशाहीसाठी लढणा-या रोहित वेमुला सारख्या विद्यार्थी नेत्याला आत्महत्या करण्यास सरकारने भाग पाडले आहे.

राज्याच्या देवेंद्र फडणवीस सरकारवर हल्ला चढवताना ते म्हणाले की, 35 हजार कोटींची शेतक-यांच्या कर्जमाफीची घोषणा अत्यंत फसवी असून सरकारने ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेतक-यांना रांगेत उभे केले. या योजनेतून केवळ पाच हजार कोटी रूपयांचे कर्ज माफ होणार आहे. उलट काँग्रेसच्या काळात केंद्र सरकारने सत्तर हजार कोटी तर राज्य सरकारने 11 हजार कोटी रूपयांचे शेतक-यांचे कर्ज माफ केले.
खा. अशोकराव चव्हाण यांनी या शहराचा विकास केला. त्यांचे नांदेडच्या विकासावर बारीक लक्ष आहे. समाजातील विविध घटकांना न्याय देण्यासाठी ते काम करित आहेत त्यामुळे ही महानगपालिका त्यांच्याकडे एकहाती द्या असे शिंदे म्हणाले.

मोहन प्रकाश
भाजपा हा गुंडाचा पक्ष झाला आहे. ज्या व्यक्तीला न्यायालयाने जिल्ह्यातून नव्हे तर राज्यातून हद्दपार केले त्यालाच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनविले आहे. देशाची सूत्रे ज्यांच्या हाती जनतेने मोठ्या विश्वासाने दिली त्यांनी मात्र देशात महागाई वाढवली. नोटबंदी करून देशातील माता भगिनींना कंगाल केले. धर्माच्या नावावर अनेकांच्या कत्तली केल्या. उत्तर प्रदेशात विद्यार्थींनींवर लाठीहल्ला केला. ऑक्सिजन न मिळाल्याने उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये शेकडो बालकांचे बळी गेले तरीही भाजप सरकार हवेतच इमले बांधण्याचे काम करीत आहे. या सरकारला जमिनीवर आणण्याचे काम नांदेडमधून मतदारांनी केले पाहिजे.
एका बाजूने भाजप सरकारची जनतेवरील अन्यायाची मालिका सुरु असताना मात्र गोरगरिबांच्या कल्याणासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी उपाध्यक्ष राहुलजी गांधी व प्रांताध्यक्ष अशोकराव चव्हाण जनतेत येऊन आंदोलने उभारत आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात मनरेगा, अन्न सुरक्षा योजना, माहितीचा अधिकार यासारख्या लोककल्याणकारी योजना राबविल्या गेल्या मात्र दुसरीकडे लोकशाहीला हरताळ फसणा-या भाजपाची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरु आहे.

खा. अशोकराव चव्हाण
मराठवाड्याचे भाग्यविधाते डॉ. शंकरराव चव्हाण यांनी नांदेडचे पहिले नगराध्यक्षपद भुषविले त्यानंतर त्यांनी राज्य आणि केंद्रात महत्त्वाच्या खात्याचे मंत्री म्हणून काम केले देशाचा कारभार करत असतानासुध्दा त्यांचे नांदेड शहर आणि जिल्ह्यावर विशेष लक्ष होते त्यांनी बांधलेल्या अनेक धरणांमुळे नांदेडमध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी मिळते भयाण दुष्काळात नांदेडकरांवर रेल्वेने पाणी आणण्याची वेळ कधीही आली नाही. विष्णुपुरी प्रकल्पातून नांदेड शहरासाठी पाणीपुरवठा होतो तरीसुध्दा 16 कोटी रूपयांची पर्यायी पाणीपुरवठा योजना आसना नदीवर उभारण्यात आली आहे. या योजनेत अप्पर पैनगंगा व दुधनीतून पाणी आणण्यात येते. या शहराच्या विकासासाठी जे काही देणे शक्य आहे किंवा जे काही करणे शक्य आहे ते सर्व काँग्रेस पक्ष आणि मी करत आहे. नांदेड शहरासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारणे असो किंवा मेडिकल कॉलेज भव्य प्रशासकीय इमारती, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम, सुंदर बगीचा, भव्य रस्ते देण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले आहे. सामाजिक, सांस्कृतीक उपक्रमात काँग्रेस पक्ष नेहमीच अग्रभागी असतो.

नांदेडकरांचा काँग्रेस पक्ष आणि माझ्यावर विश्वास आहे. नांदेडकरांचे आमच्यावर अतूट प्रेम आहे. मी नांदेडचा व नांदेड माझे हीच माझी भूमिका राहिली आहे. अनेक अडचणीच्या काळात सर्व विरोधक एकवटले असताना नांदेडकरांनी मात्र नेहमीच मला व माझ्या पक्षाला समर्थ साथ दिली आहे. या ही निवडणुकीत सुजान नागरिक काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी विधानपरिषदेचे गटनेते आ. शरद रणपिसे, माजी मंत्री अब्दुल सत्तार, रमेश बागवे, आ. भाई जगताप, हज कमिटीचे अध्यक्ष इब्राहीम भाईजान आ. डी. पी. सावंत, आ. अमरनाथ राजूरकर यांची समयोचित भाषणे झाली.

Advertisement
Advertisement