मुंबई : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेत मोठा तांत्रिक गोंधळ समोर आला आहे. ३१ डिसेंबरपूर्वी ऑनलाईन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही अनेक महिलांच्या खात्यात अद्याप अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही. ई-केवायसी दरम्यान किरकोळ चुका, चुकीची उत्तरे किंवा माहितीतील तफावतीमुळे अनेक अर्ज नाकारले गेले असून, पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळालेला नाही.
ही बाब आमदार समीर कुनावर यांच्या लक्षात समुद्रपूर पंचायत समिती येथे झालेल्या आढावा बैठकीदरम्यान आली. बैठकीत महिलांनी थेट तक्रारी मांडत अनुदान न मिळाल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्याचे सांगितले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत आमदार कुनावर यांनी बैठकीच्या सभागृहातूनच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना फोन करून संपूर्ण समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
दरम्यान, काल परिसरातील गावांमधील महिलांनीही तक्रार करत वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही बँक खात्यात पैसे न आल्याचे सांगितले. अनेक महिला या रकमेस दैनंदिन गरजांसाठी अवलंबून असल्याने योजनेतील विलंबामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
या संदर्भात मंत्री आदिती तटकरे यांनी सरकार लवकरच हा प्रश्न मार्गी लावेल, असे आश्वासन दिले. ई-केवायसीतील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी विशेष मोहिम राबवण्याचा विचार सुरू असून, एकाही पात्र महिलेचा लाभ वंचित राहू दिला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
लाडकी बहीण योजनेतील या गोंधळामुळे सरकारवर विरोधकांकडून टीकेची शक्यता असून, येत्या काळात प्रशासन कोणती ठोस पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









