Published On : Wed, Nov 27th, 2019

होलसेल कापड मार्केटजवळ पुरातन नाला सापडला

Advertisement

पुनर्निर्माणासाठी महापौरांचे निर्देश

नागपूर : पाण्याचे लिकेज शोधण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेत इतवारी येथील होलसेल क्लॉथ मार्केटजवळ वल्लभाचार्य चौक (नंगा पुतळा) येथे रस्त्याच्या सात फूट खाली पुरातन नाला सापडला. विशेष म्हणजे महापौर संदीप जोशी या जागेला भेट देऊन सदर नाल्याच्या पुनर्निर्माणाचे आदेश दिलेत.

मागील १५ दिवसांपासून सकाळी ८.३० ते ११.३० आणि दुपारी २ ते ३.३० दरम्यान मोठ्या प्रमाणात होलसेल क्लॉथ मार्केट जवळील वल्लभाचार्य चौक (नंगा पुतळा) येथे रस्त्यावर पाणी वाहत होते. यासंदर्भात नागरिकांकडून तक्रार मिळताच ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी ओ.सी.डब्ल्यू. व जलप्रदाय विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांसह पाण्याचे लिकेज शोधण्याचा प्रयत्न केला. वारंवार लिजेक शोधूनही न सापडल्यानंतर रविवारी पाणीपुरवठा बंद करण्यात आला. यानंतरही पाणी वाहत असल्याने सदर ठिकाणी खोदकाम करण्यात आले.

खोदकामादरम्यान रस्त्याच्या सात फुट खाली नाला असल्याचे निदर्शनास आले. नाल्याचे स्लॅब तोडून नाल्यातील कचरा आणि माती काढण्यात आली. यावेळी १० मीटर अंतरावर नाल्याच्या स्लॅबच्या खाली १५ इंचची जुनी पाण्याची वाहिनी असून त्याखाली स्वयंचलीत मशीनने टाकण्यात आलेल्या ऑप्टीकल फायबर केबलच्या पाईपमुळे सुमारे अडीच फुटाचा अडथळा निर्माण झाल्याचे दिसून आले. नाल्याची भिंत दगडाची असल्याने केबल टाकताना दगड कोसळले असावेत व दगड आणि पाईप यामुळे कचरा जमा होऊन हळूहळू नाला बुजला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

नाल्याची स्लॅब तोडून सफाई करण्यात आल्यानंतर पुढे नाल्याचा प्रवाह सुरळीत असल्याचे दिसून आले. मनपा आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि पोकलेनच्या माध्यमातून नाल्यातील कचरा आणि माती काढून नाल्याचे प्रवाह सुरळीत करण्यात आले. सलग तीन दिवसांच्या कार्यानंतर अखेर रस्त्यावरून पाणी वाहणे बंद झाले. ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात उपअभियंता रवींद्र बुंधाडे, कनिष्ठ अभियंता सुरेंद्र दुधे, तांत्रिक सहायक श्री.दुमाने, वरिष्ठ स्वास्थ निरीक्षक सुरेंद्र खरे, प्रभारी स्वास्थ निरीक्षक विपीन समुंद्रे यांच्या सहकार्याने संपूर्ण कार्यवाही पूर्ण करण्यात आली. अतिव्यस्त भागातील वाहतूक समस्या लक्षात घेता वाहतूक पोलिसांकडूनही सहकार्य करण्यात आले.

ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी महापौर संदीप जोशी यांना दुरध्वनीवरून माहिती देताच त्यांनी सदर भागाची पाहणी केली. कामाचे गांभीर्य लक्षात घेत नाल्याच्या ठिकाणी बांधकामाबाबत त्वरीत नस्ती तयार करून तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील यांना दिले.