Published On : Thu, Jun 24th, 2021

थकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी

जलप्रदाय समिती सभापतींचे निर्देश : विविध प्रकल्पांचा घेतला आढावा

नागपूर : मनपाच्या चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पानुसार पाणी बिलापोटी येणाऱ्या रकमेचे उद्दिष्ट मोठे आहे. अनेक ग्राहक नियमितपणे पाणी बिल अदा करीत असतात. मात्र काही ग्राहकांची थकबाकी अनेक वर्षांपासून आहे. यात शासकीय कार्यालयांचाही समावेश आहे. पाणीपुरवठ्याबाबत शहरात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहेत. मात्र, थकीत बिलांची वसुली झाली नाही तर हे प्रकल्पही रखडतील. त्यामुळे थकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करा. शासकीय कार्यालयांकडे असलेली मोठ्या रक्कमेची बिले प्राधान्याने वसूल करा. अन्यथा नियमानुसार कडक कारवाई करा, असे निर्देश जलप्रदाय समितीचे सभापती संदीप गवई यांनी दिले.

नागपूर महानगरपालिकेच्या जलप्रदाय समितीची बैठक गुरुवारी (ता. २४) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात पार पडली. सभापती संदीप गवई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, जलप्रदाय समितीचे माजी सभापती विजय झलके, उपसभापती सरला नायक, समिती सदस्य जयश्री वाडीभस्मे, लहुकुमार बेहते, शिल्पा धोटे, भुट्टो जुल्फेकार अहमद, दिनेश यादव, वैशाली नारनवरे, नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा, जलप्रदाय विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर यांच्यासह ओसीडब्ल्यू व वॉप्कोसचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत विविध विषयांचा आढावा घेत चर्चा करण्यात आली. थकीत पाणी बिल वसुलीसाठी ‘अभय योजना’ राबविण्याबाबत चर्चा झाली. योजनेसंदर्भातील प्रस्ताव जलप्रदाय विभागाने तयार करून मंजुरीसाठी मनपा आयुक्तांकडे पाठवावा, असे निर्देश सभापती संदीप गवई यांनी दिले. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत नियमित पाणी बिल भरणाऱ्या ग्राहकांनाही या योजनेचा लाभ देण्याची सूचना सभापतींनी केली. कोरोनाकाळात पाणी बिल भरणाऱ्यासाठी सवलत दिली. मात्र, हजारो ग्राहकांची पाणीपट्टी अनेक वर्षांपासून थकीत आहे. अशा ग्राहकांची गय न करता सक्तीने वसुली करण्यात यावी. अन्यथा नळ कनेक्शन कापण्यात यावे, असेही निर्देश त्यांनी दिले.

यावेळी सभापतींनी नागपूर शहरातील २४ बाय सात योजनेचा आढावा घेतला. या योजनेअंतर्गत ६८ कमांड एरिया असून ३० एरियामध्ये काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत ३८ कमांड एरियापैकी २४ एरियामध्ये अतिरिक्त कामे आवश्यक आहेत. यासह पाईपलाईन व अन्य कामांसाठी ७८ कोटींचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांनी दिली. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा आणि नेहरूनगर झोनमधील २४ बाय ७ योजनेसंदर्भात लवकरच महापौरांसोबत बैठक घेण्यात यावी, अशी सूचना सभापतींनी यावेळी केली. भुट्टो जुल्फेकार अहमद यांनी मोमिनपुरा मध्ये 24X7 तास योजना सुरु करणे तसेच अमृत योजनामध्ये मेयो हॉस्पीटल येथे पाण्याची टाकीचे बांधकाम करण्याचे सूचित केले.

समिती सदस्य दिनेश यादव यांनी उपस्थित केलेल्या टँकरमधील हेराफेरीच्या मुद्यावर सभापतींनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, विशिष्ट टँकर एकाच ठिकाणी न पाठवता प्रत्येक वेळी ते अन्य भागात पाठविण्यात यावे. टँकरच्या बाबतीत घडणारे प्रकार गंभीर असून अधिकाऱ्यांनी यावर स्वत: लक्ष द्यावे, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. नागपूर शहरात मनपाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या पाण्याचा बॉटलिंग प्लान्ट असावा, अशी महापौरांची संकल्पना आहे. या प्रकल्पाचा पाठपुरावा करून अंतिम स्वरूप द्यावे, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. अमृत योजनेचाही यावेळी सभापतींनी आढावा घेतला.