Published On : Thu, Jun 24th, 2021

झिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा

महापौरांचे निर्देश : कामाची केली पाहणी

नागपूर : मेट्रोच्या झिरो माईल स्टेशन (मॉरिस कॉलेज चौक) पासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला जोडणा-या डी.पी.रस्त्याचे बांधकाम त्वरित पूर्ण करण्याचे आदेश महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी महामेट्रोच्या अधिका-यांना दिले. गुरुवारी (ता. २४) त्यांनी या रस्त्याचा पाहणी दौरा केला.

झिरो माईल रेल्वे स्टेशन ते विद्यापीठ रस्त्याचे बांधकाम गेल्या काही वर्षापासून प्रलंबित आहे. सदर बांधकाम महामेट्रो आणि मनपातर्फे करण्यात येत आहे. मेट्रो स्टेशनच्या खालच्या भागाचे बांधकाम मेट्रोला करावयचे आहे. सोबतच ७०० एम.एम.ची पाण्याची पाईपलाईनसुध्दा स्थानांतरित करायची आहे. मनपाच्या अख्यत्यारीत असलेले काम पूर्ण झाले असून महामेट्रोच्या अख्यत्यारीत असलेले काम शिल्लक आहे. हे काम झाल्यानंतरच हा रस्ता वाहतुकीसाठी सुरु करण्यात येईल. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होण्याच्या दृष्टीने एक महिन्यात बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी दिले.

स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते झिरो माईल स्टेशनचे नामकरण ‘झिरो माईल फ्रीडम पार्क स्टेशन’ असे करण्यात येणार आहे. तत्पूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी संबंधितांना दिले.

यावेळी महामेट्रोचे कार्यकारी निदेशक अनिल कोकाटे, मनपाच्या लोककर्म विभागाचे अधीक्षक अभियंता अभय पोहेकर, मनपा धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर व मनोज गद्रे उपस्थित होते.