Published On : Wed, Oct 28th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात १३.९० लाखांचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त; ऑटोचालकाला अटक

३६० बंडल जप्त, पुरवठा करणाऱ्या दोघांचा शोध सुरू
Advertisement

नागपुरात १३.९० लाखांचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त; ऑटोचालकाला अटक

नागपूर : शहरात प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध वाहतूक आणि विक्रीविरोधात गुन्हे शाखेच्या वाहनचोरीविरोधी पथकाने मोठी कारवाई केली. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिम्बायोसिस कॉलेज रोड परिसरात केलेल्या या कारवाईत पोलिसांनी १३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, ऑटोचालकाला अटक केली आहे. प्रतिबंधित मांजाचा पुरवठा करणाऱ्या अन्य दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पथक वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना सिम्बायोसिस कॉलेज रोडवरील रमनागिरी, बिडगाव परिसरात एका ऑटोमधून संशयास्पद वस्तूंची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. ऑटोमध्ये प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये सामान लपवून नेले जात होते. संशय आल्याने पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत ऑटोची तपासणी केली.

या तपासणीत प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये मोठे बॉक्स आढळून आले. बॉक्स उघडून पाहिले असता त्यामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा असल्याचे उघड झाले. पोलिसांनी या कारवाईत नायलॉन मांजाचे ३६० सीलबंद बंडल जप्त केले. या बंडलची किंमत १० लाख ८० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय तीन लाख रुपये किमतीचा ऑटो आणि एक मोबाइल फोनही जप्त करण्यात आला.

या प्रकरणी वाठोडा पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या ऑटोचालकाकडून मांजा कोठून आणण्यात आला आणि तो कोणाला पुरवला जाणार होता, याचा तपास पोलीस करत आहेत. या अवैध व्यवहारात सहभागी असलेल्या अन्य दोन आरोपींचा शोध सुरू असून, संपूर्ण पुरवठा साखळी उघड करण्यासाठी तपास सुरू आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.