महापौरांनी केली पाहणी : शुक्रवारपासून सुरू होणार कार्यवाही
नागपूर, : वर्धा रोडवर अजनी मेट्रो स्टेशन जवळील नवीन डबलडेकर उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूच्या घरांच्या सुरक्षा भिंती तोडण्याचे काम शुक्रवार (२५ जून) पासून सुरु होणार आहे. नागपूर महानगरपालिका आणि महामेट्रो मिळून सुरक्षा भिंती तोडण्याचे काम करणार आहे. उड्डाण पुलाच्या खालचा रस्ता रुंद करून वाहन चालकांना होणारा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने ही मोहीम हाती घेण्यात येत आहे.
महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी कार्यकारी अधीक्षक अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग) अभय पोहेकर, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, कार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षानी, स्वावर अधिकारी राजेन्द्र अंबारे यांच्यासोबत या मार्गाची पाहणी केली. या रस्त्यावर दोन्ही बाजूच्या ३४ घर मालकांना नुकसान भरपाईची रक्कम देऊन जागा ताब्यात घेण्यात आली आहे. या घर मालकांनी तिथे नवीन कंपाऊंडवॉल सुध्दा टाकली आहे.
परंतु नागपूर महानगरपालिकेतर्फे त्यांची जुनी कंपाऊंड वॉल अद्यापही तोडण्यात आली नाही. या रस्त्यावर काही ठिकाणी घाण ही पसरली आहे. महापौरांनी लक्ष्मीनगर झोनच्या अधिका-यांना तात्काळ कंपाऊंड वॉल तोडून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या निर्देशानुसार शुक्रवारपासून या कामाची सुरुवात होणार असल्याचे सहायक आयुक्त गणेश राठोड यांनी सांगितले.