Published On : Mon, Jun 7th, 2021

नवरात्रीपूर्वी कोराडी मंदिर परिसरातील कामे पूर्ण करा..

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला विकास कामांचा आढावा

नागपूर : कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा माता मंदिर परिसरातील विकास कामे येत्या नवरात्रीपूर्वी पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कोराडीतील महालक्ष्मी जगदंबा माता मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी माजी मंत्री व कोराडीतील महालक्ष्मी जगदंबा मंदिर संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, नागपूर महानगर विकास प्राधिकरण सभापती मनोज सूर्यवंशी उपस्थित होते. महानिर्मिती, महापारेषण, महाऊर्जातर्फे मंदिर परिसरात विविध विकास कामे प्रगतीपथावर आहेत.

विविध विकास कामांचे संगणकीय सादरीकरण करण्यात आले. कोराडी मंदिर परिसरातील विविध इमारतींवर सौर ऊर्जेचे संच उभारण्यात येणार आहे.यातून ११६८ किलोवॅट उर्जेची निर्मिती होणार आहे.कोराडी मंदिर परिसरातील विविध इमारतींवर सौर ऊर्जेचे संच राहणार आहे.हा प्रकल्प २५ वर्षांसाठी असून यातून ३.४७ कोटी युनिट विजेची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज खरेदी करण्याच्या संदर्भात यावेळी डॉ. नितीन राऊत यांनी महालक्ष्मी जगदंबा मंदिर देवस्थानच्या विश्वस्तांशी सुद्धा चर्चा केली. मंदिर परिसरात होणाऱ्या विकास कामांचे उद्घाटन येत्या नवरात्रीत करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

मंदिर परिसरात येणाऱ्या भाविक तथा पर्यटकांसाठी परिसराचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे. कोराडी औष्णिक वीज केंद्राला लागून असलेल्या पॉँड क्रमांक तीनचे सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. धार्मिक व सांस्कृतिक बाजू लक्षात घेऊन सौंदर्यीकरण केले जाणार आहे. जवळपास १० हजार ७०० चौरस फूट परिसरात हा ऊर्जा पार्क प्रस्तावित आहे. यावर ११० कोटी खर्च होणार आहे. कोराडी औष्णिक वीज प्रकल्पाच्या सांघीक सामाजिक दायित्व (सी.एस.आर.) निधीतून हा प्रकल्प साकारल्या जाणार आहे.

एनर्जी एज्युकेशन पार्क
वीज निर्मितीबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी महानिर्मितीतर्फे एनर्जी एज्युकेशन पार्क उभारला जाणार आहे. हा पार्क कोराडी मंदिर परिसरात होणार आहे. जवळपास पाच एकराच्या परिसरात होणाऱ्या या पार्कवर २५ कोटी रुपये खर्च होणार आहे. यात १७६० चौरस मीटरचा अत्याधुनिक इनडोअर प्रदर्शनी सभागृह सुद्धा राहणार आहे.

मध्यान्ह भोजनासाठी मंदिर परिसरात मध्यवर्ती किचन प्रस्तावित असून परिसरातील ४० शाळांमधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यात येणार आहे. स्वामी नारायण मंदिरच्या सहाय्याने सात्विंक भोजन निर्मिती होणार आहे. या किचनचे बांधकाम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. राऊत यांनी दिले.
नागपूर महानगर विकास प्राधिकरणकडून २२० कोटींचे कामे

मंदिर परिसरात नागपूर महानगर प्राधिकरणतर्फे विकास कामे सुरू असून यात जवळपास २०० कोटी रुपये खर्च झाले असून राज्य सरकारकडून २२ कोटी रुपये मिळायाचे आहे. एनएमआरडीएकडून या निधीतून मंदिर परिसराची संरक्षण भिंत (४.६८ कोटी), शॉपिंग कॉम्प्लेक्स (२२. ६६ कोटी), बसस्टॉप (१०.९६ कोटी), वाहन तळ (१४.६७ कोटी), भक्तनिवास (४३.६० कोटी), सेव्हन डी थिएटर (१३.६६ कोटी), पुजारी निवास (२६.५९ कोटी), मंदिर सभागृह (१६.३७ कोटी), कुकिंग शेड (२.३७ कोटी), महाद्वार (२२.१२ कोटी), अप्रोच रोड (४.९७ कोटी) आदी कामे होणार आहेत. यावेळी मंदिर देवस्थानचे अध्यक्ष व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंदिरात सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली. या संदर्भात राज्य सरकारने हा निधी त्वरित द्यावा, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.

यावेळी मुख्य अभियंते राजेश कराडे, राजेश पाटील, राजकुमार तासकर, अनिल आष्टीकर, राजू घुगे, वास्तुशिल्पी अशोक मोखा, महाऊर्जा प्रादेशिक अधिकारी वैभव पाथोडे, नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्य अभियंता नीला उपाध्ये, जिल्हा परिषदेचे सदस्य नाना कंभाले, मंगेश देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.