Published On : Thu, Mar 8th, 2018

३१ मार्चपर्यंत कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करा


नागपूर:  नागपूर महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे. ३१ मार्चपर्यंत मनपाच्या कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश नवनियुक्त स्थायी समिती सभापती विरेंद्र (विक्की) कुकरेजा यांनी दिले. गुरूवारी (ता.८) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात कर वसुलीचा आढावा बैठकीत ते बोलत होते.

याप्रसंगी माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, कर आकारणी व कर संकलन समिती सभापती संदीप जाधव, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, सहायक आयुक्त (बाजार विभाग) महेश धामेचा, सहायक आयुक्त (कर विभाग) मिलिंद मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी स्थायी समिती सभापती विरेंद्र कुकरेजा यांनी झोन निहाय कर वसुलीचा आढावा घेतला. मनपाच्या कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण झाले तर, शहरातील विकासाची कामे गतीने करता येईल. त्यामुळे वसुली कार्य जोमाने करा, असे निर्देश विक्की कुकरेजा यांनी दिले. शनिवार व रविवारी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वसुलीसाठी आपली कार्यालये सुरू ठेवावीत, असेही निर्देश त्यांनी दिले. लाउडस्पीकर लावून जनजागृती करण्याचेही त्यांनी सांगितले.

कर विभागाद्वारे १ एप्रिल २०१७ पासून आजपर्यंत झालेल्या वसुलीचा आढावा यावेळी त्यांनी घेतला. बाजार विभागाचा आढावाही घेण्यात आला. नगररचना विभागाद्वारे मंजूर करण्यात आलेले नकाशे याबाबतही आढावा स्थायी समिती सभापतींनी घेतला. नगररचना विभागासंबंधी माहिती देताना सहायक संचालक (नगररचना) प्रमोद गावंडे यांनी चालू आर्थिक वर्षात एकूण ९० कोटींपैकी ७२.७८ कोटी रूपयाचे आर्थिक उत्पन्न प्राप्त झाले असल्याची माहिती दिली. तसेच एकूण ८३० नकाशे मंजुरीसाठी प्राप्त झाले होते त्यापैकी २४५ नकाशे मंजूर झाले व ४३९ नामंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी नगररचना विभागाकडून मोठ्या प्रमाणात नकाशे नामंजूर झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे हे नकाशे नामंजूर होण्याच्या कारणासह विस्तृत अहवाल सादर करण्याचे निर्देश स्थायी समिती सभापतींनी त्यांना दिले. तसेच नवीन विकास नियंत्रण नियमावली तयार करण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले.

मालमत्ता कर व कर आकारणी विभागाद्वारे १४१.०२ कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम यांनी दिली. १,९२,६१५ थकबाकीदारांकडे असलेली ७५ कोटी रुपये थकीत रक:कम वसूल करणेबाबत, जंगम मालमत्ता जप्त करणेबाबत उचित कार्यवाही पूर्ण करून ३१ मार्च पर्यंत उद्दिष्ट गाठण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहितीही त्यांनी स्थायी समिती सभापतींना दिली.

बाजार विभागाची माहिती देताना सहायक आयुक्त (बाजार) महेश धामेचा यांनी सांगितले की, एकूण डिमांड ६८२.५७ लक्ष असून फेब्रुवारी २०१८ पर्यंत ५४१.८५ लक्ष वसुली झालेली आहे. त्याची टक्केवारी ७९.३८ इतकी आहे. ७ मार्च २०१८ पर्यंत ५७९ लक्ष वसुली झाली असून ही टक्केवारी ८४ इतकी आहे. उर्वरीत थकीत वसुली ३१ मार्च पर्यंत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. एकूण २७ दुकाने बाजार विभागामार्फत सील करण्यात आले असून त्या माध्यमातून ३४.८५ लक्ष वसुली करण्यात आली आहे. ३०८ दुकानांना कार्यवाहीसाठी नोटीस बजावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीला मनपाच्या दहाही झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते.