Published On : Tue, Jun 4th, 2019

एलईडी विद्युत दिव्यांचे काम १५ दिवसांत पूर्ण करा : प्रवीण दटके

Advertisement

प्रलंबित कामाचा घेतला आढावा

नागपूर : संपूर्ण शहरात एलईडी विद्युत दिवे लावण्याचे महत्त्वाकांक्षी कार्य नागपूर महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले. मात्र निर्धारित कालावधी लोटूनही संपूर्ण कार्य पूर्ण झाले नाही. पावसाळ्यापूर्वी सर्वत्र एलईडी विद्युत दिवे लावण्याचे कार्य पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे या कार्यामध्ये येणारे अडथळे दूर करून येत्या १५ दिवसात उर्वरित संपूर्ण ठिकाणी विद्युत दिवे लावून कार्य पूर्णत्वास न्यावे, असे निर्देश प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यासाठी महापौर यांच्याकडून गठीत समितीचे अध्यक्ष प्रवीण दटके यांनी दिले.

शहरातील अनेक कामे प्रलंबित असल्याने या कामाला गती देण्यासाठी व त्यावर देखरेख ठेवण्यासाठी महापौर नंदा जिचकार यांनी माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत केली. या समितीची मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभागृहात सोमवारी (ता.३) बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीला समितीचे अध्यक्ष प्रवीण दटके यांच्यासह उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, आयुक्त अभिजीत बांगर, जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त नितीन कापडणीस, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सहसंचालक नगररचना प्रमोद गावंडे, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, कार्यकारी अभियंता (विद्युत) ए.एस. मानकर, कार्यकारी अभियंता (हॉटमिक्स प्लान्ट) राजेश भूतकर, कार्यकारी अभियंता (बांधकाम) एम.जी. कुकरेजा, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता (स्लम) राजेंद्र रहाटे, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, कार्यकारी अभियंता सोनाली कडू, नद्या व सरोवरे पुनरुज्जीवन प्रकल्प विभागाचे सल्लागार मो. इस्राईल, नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे अधिकारी राजेश दुफारे, सहायक आयुक्त (बाजार विभाग) विजय हुमने, सहायक आयुक्त (अतिक्रमण) अशोक पाटील, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, गणेश राठोड, स्मिता काळे, प्रभारी कार्यकारी अभियंता अमीन अख्तर, अविनाश बारहाते, नगर रचना विभागाचे श्रीकांत देशपांडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

समितीचे अध्यक्ष प्रवीण दटके यांनी यावेळी शहरातील विविध प्रलंबित कामाचा आढावा घेतला. शहरातील एलईडी विद्युत दिवे लावण्याच्या कार्याचा त्यांनी झोननिहाय आढावा घेतला. यामध्ये सतरंजीपूरा झोनमधील एलईडी विद्युत दिवे लावण्याचे कार्य शंभर टक्के पूर्ण झाल्याची माहिती विद्युत विभागाकडून देण्यात आली. या कार्याबद्दल अभिनंदन करून उर्वरित सर्व झोनमधील कार्यही याच गतीने करून १५ दिवसात शंभर टक्के कार्य पूर्ण करण्याचे निर्देश समिती अध्यक्ष प्रवीण दटके यांनी दिले.

शहरात सुरू असलेल्या सिमेंट रस्ते बांधकामाच्या कार्याचाही समिती अध्यक्ष प्रवीण दटके यांनी यावेळी आढावा घेतला. शहरात पाच नवीन सिमेंट रस्ते प्रस्तावित असून या मार्गाच्या कामाला लवकरात लवकर सुरूवात करून जुने कार्य ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश त्यांनी दिले. सिमेंट रस्ते बांधकामातील दिरंगाईमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. निर्धारित कालावधीपेक्षा जास्त कालावधी देऊनही काम पूर्णत्वास न नेणाऱ्या, कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला काम देण्यात येऊ नये, अशी सक्त ताकीदही यावेळी समिती अध्यक्ष प्रवीण दटके यांनी दिली.

मनपाच्या बॉटलिंग प्लाँट प्रकल्पाने होणार खर्चाची बचत

नागपूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित बॉटलिंग प्लाँट प्रकल्पासंदर्भातही समिती अध्यक्ष प्रवीण दटके यांनी आढावा घेतला व प्रकल्पाची माहिती दिली. नागपूर महानगरपालिकेच्या या प्रकल्पामुळे जलप्रदाय विभागावर होणाऱ्या विद्युत खर्चात ५० टक्के बचत होणार असून यामध्ये सौर प्रकल्पाचा अंतर्भाव केल्यास आणखी ५० टक्के खर्च वाचणार आहे. प्रवीण दटके महापौर असताना या प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली होती. तत्कालीन महापौर प्रवीण दटके यांनी या प्रकल्पाला मूर्तरुप देण्यासाठी प्रयत्नही सुरू केले होते. त्यावेळी मनपाने हा प्रकल्प साकारल्यास संपूर्ण पाणी विकत घेण्यासाठी रेल्वेने तयारी दर्शविली होती. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होणे अत्यंत आवश्यक असून या प्रकल्पामुळे नागपुरातील जनतेला माफक दरामध्ये पिण्याचे शुध्द बाटलीबंद पाणी मिळणार आहे, अशी माहिती देत या प्रकल्पाच्या कार्यातील त्रुट्या, अडथळे दूर करुन प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याचेही समिती अध्यक्ष प्रवीण दटके यांनी निर्देशित केले

बुधवार बाजार महाल, बुधवार बाजार सक्करदरा, कमाल टॉकीज जवळील बाजार, महाल येथील मासोळी बाजार आदी मार्केट प्रकल्पांच्या कार्याचाही समिती अध्यक्ष प्रवीण दटके यांनी यावेळी आढावा घेतला. सर्व बाजार प्रकल्पांचे प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय ऑरेंट सिटी स्ट्रीट प्रकल्प, डी.पी. रस्ते, नाग नदी प्रकल्प आणि भरतवाडा, पुनापूर, स्मार्ट सिटी प्रकल्प, शहरातील दहन घाटांचा पर्यावरण पुरक विकास करणे, पुण्याच्या धर्तीवर शवदाहीनींचे निर्माण कार्य करणे, गोवऱ्या आणि ब्रिकेट्सचा वापर करणे आदींचीही विस्तृत माहिती घेऊन त्यांच्या कामाचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश समिती अध्यक्ष प्रवीण दटके यांनी यावेळी दिले.