नागपूर – देशभरातील नागरिकांना पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात नव्याने वाढ करण्यात आली असून, अवघ्या दहा दिवसांत इंधनाचे दर तिसऱ्यांदा वाढले आहेत. आधीच वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांसाठी ही दरवाढ मोठी चिंता ठरत आहे.
नवीन दरांनुसार पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी महागले असून डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोलचा दर 107.87 रुपये प्रति लिटरवर पोहोचला असून डिझेलसाठी आता 94.39 रुपये मोजावे लागणार आहेत.
दहा दिवसांत सलग तिसरी वाढ-
मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच इंधन दर वाढीचा सिलसिला सुरू आहे. 15 मे रोजी प्रतिलिटर 3 रुपयांनी दरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर 19 मे रोजी पुन्हा जवळपास 90 पैशांची वाढ झाली. आता झालेल्या ताज्या वाढीनंतर पेट्रोल-डिझेलच्या किमती जवळपास 5 रुपयांनी वाढल्या आहेत.
राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 99.51 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 92.49 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचल्याची माहिती इंधन विक्रेत्यांनी दिली आहे.
जागतिक परिस्थितीचा थेट परिणाम-
इराणमधील युद्धजन्य परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती याचा परिणाम भारतातील इंधन दरांवर दिसून येत आहे. भारत मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आयात करत असल्याने जागतिक बाजारातील चढ-उतारांचा थेट आर्थिक परिणाम देशावर होत आहे. वाढलेल्या आयात खर्चामुळे तेल कंपन्यांवर दबाव वाढला असून, त्याचा भार आता ग्राहकांवर पडताना दिसत आहे.
महागाई आणखी वाढण्याची भीती
इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असून त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होऊ शकतो. भाजीपाला, धान्य, किराणा तसेच दैनंदिन सेवांचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आधीच वाढत्या खर्चामुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांच्या खिशावर आणखी ताण पडण्याची चिन्हे आहेत.








