Published On : Wed, Jun 30th, 2021

कोव्हिड काळातील गैरव्यवहाराच्या आरोपाच्या चौकशीसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेत समिती

महापौरांचे निर्देश : महालेखाकार कार्यालयातील दोन वरिष्ठ लेखापरीक्षकाचा असणार समावेश

नागपूर : कोव्हिडच्या काळात नागपूर महानगरपालिका प्रशासनाकडून विविध आवश्यक वैद्यकीय सामुग्री खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांच्यामार्फत करण्यात आला. या प्रकरणी प्रशासनाद्वारे खरेदी करण्यात आलेल्या सर्व बिलांचे अंकेक्षण करून संपूर्ण प्रक्रियेची सविस्तर चौकशी करण्यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करण्यात आलेली आहे. समितीमध्ये महालेखाकार कार्यालयातील दोन वरीष्ठ लेखापरीक्षकाचा समावेश असणार आहे. दोन्ही लेखापरीक्षकांच्या सहकार्याने आयुक्तांनी संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करून महिनाभरात त्याचा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवावा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी महासभेत दिले.

ज्येष्ठ नगरसेविका श्रीमती आभा पांडे यांनी मागच्या सर्वसाधारण सभेत कोरोना साथरोग दरम्यान आरोग्य विभागाकडून खरेदी मध्ये गैर व्यवहार झाल्याचा आरोप करुन स्थगन प्रस्ताव आणला होता. त्यावेळेस सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे यांनी सुध्दा एक पत्र देवून संपूर्ण माहिती पटलावर ठेवण्याची विनंती महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांना केली होती. त्या अनुषंगाने बुधवारी (३० जून) रोजी स्थगन प्रस्ताव व आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालावर चर्चा करण्यासाठी ऑनलाईन सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी चर्चेमध्ये सहभागी झालेल्या सदस्यांमार्फत प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्याची मागणी करण्यात आली. सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी चौकशी समिती गठीत करण्याची सूचना मांडली. मनपा प्रशासनाद्वारे झालेल्या खरेदी व्यवहाराचे शासनाच्या नियमावलीनुसार ऑडिट होणार असून त्यावर सभागृहाची समिती गठीत करण्याची सध्या गरज नसल्याचे यावेळी महापौरांनी स्पष्ट केले. शहरात पहिला रुग्ण निदर्शनास येणे व आतापर्यंत मनपा प्रशासनाद्वारे कार्यामध्ये विविध सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. या काळामध्ये अनेक खरेदी व्यवहार झाले आहेत. त्याबद्दल सभागृहातील कुठल्याही सदस्याच्या मनामध्ये शंका, संभ्रम राहू नये यासाठी याची आयुक्तांमार्फत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे महापौरांनी निर्देशित केले. संपूर्ण खरेदी व्यवहाराची आयुक्तांनी महालेखाकार कार्यालयातील दोन्ही वरीष्ठ लेखापरीक्षकासह सखोल चौकशी करावी. याशिवाय ज्या सदस्यांना या विषयाच्या अनुषंगाने आपले मत मांडायचे आहे त्यांनी आयुक्तांना सूचित करून समितीद्वारे निर्धारित तारखेला त्यांच्यापुढे जाउन आपले मत मांडू शकतील, असेही यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. त्यांनी कोरोना महामारीच्या दरम्यान जीवाची पर्वा न करता काम करणारे सर्व अधिकारी – कर्मचारी यांचे विशेष रुपाने अभिनंदन केले.

वास्तव पुढे येण्यासाठी चौकशी आवश्यक : अविनाश ठाकरे
कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाद्वारे झालेल्या खरेदी प्रक्रीयेतील अनियमितता व उपस्थित होत असलेल्या गैरव्यवहाराच्या शंकांबाबत समिती गठीत करून चौकशी करणे आवश्यक असून त्यातूनच योग्य ते वास्तव पुढे येईल, अशी मागणी सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांच्यामार्फत महासभेत करण्यात आली.

आरोग्य विभागाद्वारे सादर करण्यात आलेल्या अहवालावर मुद्देनिहाय सत्तापक्ष नेत्यांनी आपले मत मांडले. प्रशासनाद्वारे सादर अहवालामध्ये कोव्हिड संबंधी आवश्यक साहित्य व उपाययोजनांसाठी जिल्हास्तरीय समितीद्वारे मंजुर करण्यात आलेल्या एसडीआरएफ निधीसंदर्भात दोन भागात विभागणी करून त्याची चौकशी करण्याची विनंतीही सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी केली. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींच्या विलगीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड केअर सेंटरमधील व्यवस्थेसाठी एसडीआरएफ निधी अंतर्गत झालेल्या खर्चाच्या आदेशामध्ये तफावत असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांच्याद्वारे करण्यात आलेल्या आरोपांची योग्य तपासणी करून त्याची सखोल चौकशी आवश्यक आहे. चौकशीमधूनच ‘दुध का दुध और पानी का पानी’ होईल, अशीही मागणी त्यांनी लावून धरली होती.

चर्चेमध्ये स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे, नगरसेवक सर्वश्री संदीप सहारे, मनोज सांगोळे, नितीन साठवणे, संदीप जाधव, धर्मपाल मेश्राम, माजी स्थायी समिती सभापती विजय झलके व माजी महापौर नंदा जिचकार यांनी सहभाग घेतला.