Published On : Wed, Jun 30th, 2021

मुख्यमंत्री यांच्या हस्ते पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार

कृषी विभागाच्या युट्युब चॅनेलवर शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे – हिंदुराव चव्हाण

भंडारा:- खरीप हंगाम 2021 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कृषी विभागातर्फे 21 जून ते 1 जुलै 2021 या कालावधीत महत्वाच्या मोहिमांवर विशेष भर देत कृषी संजीवनी मोहीम यशस्वीपणे पार पडली.

1 जुलै हा दिवस महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या कृषी दिनी या कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप होत आहे. या निमित्ताने सन 2020 च्या रब्बी हंगामातील पीक स्पर्धेत विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार होणार आहे.

पीक स्पर्धेत विजेत्या शेतकऱ्यांना जिल्हा, विभाग तसेच राज्य स्तरावर गौरविले जाणार असल्याची माहिती भंडाराचे जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी दिली. जिल्हास्तरावर भंडारा तालुक्यातील चिखली येथील विष्णुदास हटवार या शेतकऱ्याचा जिल्हास्तरावर 2020 च्या रब्बी पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

राज्यस्तरावर कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री, राज्यमंत्री, कृषी विभागाचे सचिव, आयुक्त यांची उपस्थिती राहणार आहे. सदर कार्यक्रमातून मुख्यमंत्री हे कृषी विभागाच्या रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी विभागाच्या युट्युब चॅनेल www.youtube.com/C/AgricultureDepartmentGom वरून होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.