Published On : Tue, Aug 4th, 2020

कोव्हिड टेस्टिंग सेंटर आणि कोव्हिड केअर सेंटरला आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट

रुग्ण आणि नागरिकांशी साधला संवाद

नागपूर : पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकानी तातडीने कोव्हिड चाचणी करून घ्यावी या उद्देशाने शहरात विविध ठिकाणी सुरू केलेल्या कोव्हिड टेस्टिंग सेंटरला मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेट दिली. इतकेच नव्हे तर आमदार निवास कोव्हिड केअर सेंटरमधील पॉझिटिव्ह आलेल्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. नागरिकांनी पण सेंटरमध्ये दिल्या जाणा-या सेवांचा लाभ घेतला.

Gold Rate
13 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,24,100/-
Gold 22 KT ₹ 1,15,400/-
Silver/Kg ₹ 1,80,700/-
Platinum ₹ 52,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपा आयुक्तांनी केलेला हा दौरा म्हणजे कोव्हिड विरुद्ध लढणाऱ्या योद्धांचा आणि रुग्णांचा उत्साह वाढविणारा ठरला. कोव्हिड टेस्टिंगसाठी आलेल्या नागरिकांना मार्गदर्शन करीत उपस्थितांनाही आश्चर्याचा सुखद धक्का दिला. मनपा व्दारे २१ ठिकाणा कोविड टेस्टिंग सेंटर सुरु करण्यात आले आहे.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी मुख्यालयातून थेट पाचपावली पोलिस वसाहतीत सुरु करण्यात आलेल्या कोव्हिड टेस्टिंग सेंटरला भेट दिली. या ठिकाणी टेस्टिंगसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली. कोव्हिड १९ साठी रॅपिड टेस्ट कशी केली जाते, चाचणीचा अहवाल किती वेळात देण्यात येतो, डाटा एन्ट्री कशी केली जाते, याबाबत संपूर्ण माहिती घेतली. यावेळी चाचणीसाठी तेथे उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना मार्गदर्शन केले. येथे रॅपिड टेस्ट केल्यानंतर अर्धा तासात अहवाल प्राप्त होतो. चाचणी जर पॉझिटिव्ह आली तर घाबरण्याचे मुळीच कारण नाही. येथून पुढे कुठे जायचे, उपचार कुठे होतील, लक्षणे नसतानाही पॉझिटिव्ह आले तर काय करावे, याबाबत मनपाच्या आरोग्य यंत्रणेची चमू पूर्णपणे मार्गदर्शन करेल, असे त्यांनी सांगितले. लक्षणे असताना पॉझिटिव्ह आलात तर रुग्णांवर रुग्णालयात उपचार होतील. लक्षणे नसतील तर गृह विलगीकरणात पाठविण्यात येईल. जर चाचणी निगेटिव्ह आली तरी नियम पाळण्यापासून आपण सुटणार नाही. नियमांचे बंधन सर्वांवरच आहे. त्यामुळे काळजी घ्या आणि शहराला सुरक्षित ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.


यानंतर त्यांनी पाचपावली पोलिस वसाहतीत तयार करण्यात आलेल्या कोव्हिड केअर सेंटर येथील व्यवस्थेची पाहणी केली. पिरामिड सिटी शंभूनगर कॉलनी येथे सुरू असलेल्या शिबिरालाही आयुक्तांनी भेट दिली. तेथेही त्यांनी नागरिकांशी संवाद साधला, कुणाला लग्नात सहभागी होऊन कोरोना झाला तर कुणाला पार्टीने कोरोना दिल्याचे त्यांनी केलेल्या संवादातून लक्षात आले, एक खाजगी डॉक्टर सुध्दा या शिबिरात चाचणी करुन घेण्यासाठी आल्याचे लक्षात आले.किमान डॉक्टरांनी तरी चाचणीसाठी शिबिराची वाट न बघता लक्षणे आढळल्यास किंवा पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आल्यास तातडीने चाचणी करुन घ्यावी असा उपदेश दिला. पॉझिटीव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेले व्यक्ती चाचणी करुन घेत नाहीत, नियमांचे पालन करीत नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली. त्यावर नागरिकांनी सतर्क राहून मनपाच्या नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती द्यावी, अशी सूचना केली. जो ऐकत नसेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तेथील उपस्थित वैद्यकीय अधिकारी पॅरामेडीकल व इतर कर्मचारी यांनाही मार्गदर्शन केले.

यानंतर त्यांनी इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड टेस्टिंग सेंटरची पाहणी केली. येथेही चाचणीकरिता आलेल्या नागरिकांशी संवाद साधत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त राम जोशी उपस्थित होते.

कोरोना रुग्णांशी संवाद
नागपुरातील आमदार निवासात नवे कोव्हिड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला येथे आणले जाते. तेथे रुग्णांच्या अन्य चाचण्या केल्या जातात. याठिकाणी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या आमदार निवासातील खोल्यांमध्ये जाऊन थेट त्यांच्याशी संवाद साधला. यापुढे कोव्हिड संदर्भातील नियम नागरिकांनी पाळावे, कोरोनाला घाबरण्यापेक्षा वेळीच चाचणी करवून घ्या आणि कोरोना योद्धा बना, असे आवाहन त्यांनी केले. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, विलगीकरण केंद्र, कोव्हिड केअर सेंटर, कोव्हिड रुग्णालय आदी ठिकाणी कार्यरत कर्मचारी, पॅरामेडिकल कर्मचारी आदींच्या धाडसाचे कौतुक केले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन करीत त्यांनी दिलेल्या सेवेचा गौरव केला.

Advertisement
Advertisement