मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेतून राज्यातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांचा थेट आर्थिक लाभ मिळतो. मात्र जून महिन्याचा हप्ता अजूनही जमा झालेला नसल्याने लाभार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर आता दिलासादायक बातमी समोर येत आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जून आणि जुलैचे दोन्ही हप्ते एकत्र बँक खात्यांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांना यंदा थेट ३००० रुपयांचा लाभ मिळू शकतो. ही रक्कम जुलै महिन्याच्या सुरुवातीस, आषाढी एकादशीच्या आधी किंवा त्या आसपास जमा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र महिलांच्या खात्यात ११ हप्त्यांद्वारे एकूण १६,५०० रुपये जमा करण्यात आले आहेत. येणाऱ्या हप्ता वितरणात जर दोन महिन्यांची रक्कम एकत्र आली, तर योजनेचा लाभ आणखी प्रभावी ठरणार आहे.
जरी सध्या शासनाकडून अधिकृत घोषणेसाठी प्रतीक्षा असली, तरी काही स्पष्ट संकेत मिळाले आहेत. त्यामुळे लाभार्थी महिलांनी आपले बँक खाते नियमितपणे तपासावे, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात येत आहे.
या योजनेमुळे अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळालं असून, वेळेवर मिळणारा हप्ता त्यांच्या दैनंदिन गरजांमध्ये उपयोगी ठरतो. त्यामुळे यापुढील रक्कम वेळेवर मिळावी, अशी अपेक्षा महिलांमध्ये दिसून येत आहे.