मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली आहे. त्रिभाषा सूत्रातील हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानंतर आज मुंबईत झालेल्या विजय मेळाव्यात ठाकरे बंधू – उद्धव आणि राज – तब्बल दोन दशकांनंतर एका व्यासपीठावर एकत्र आले. यावेळी उद्धव ठाकरेंनी महत्त्वपूर्ण घोषणा करत स्पष्ट केलं, “एकत्र आलोय, ते आता कायमचं एकत्र राहण्यासाठी!”
या मेळाव्याची सुरुवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जोरदार भाषणाने झाली. त्यांनी आपल्या शैलीत उपस्थितांना संबोधित केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी व्यासपीठावर येत राज ठाकरे यांचं खुलेपणाने कौतुक केलं. “राजांनी मला ‘सन्माननीय उद्धव ठाकरे’ म्हटलं, त्यामागे त्यांचं कर्तृत्व आहे, जे आपण सर्वांनी पाहिलं आहे,” असे उद्गार त्यांनी काढले.
त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, आजच्या कार्यक्रमात भाषणांपेक्षा सर्वांचे लक्ष एकत्रित येण्याकडे लागलं आहे. “या दृश्यामुळेच अनेकांना संदेश मिळतोय,” असं ते म्हणाले.
“एकत्र आलोय, एकत्रच राहणार!” – स्पष्ट संदेश
आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी दोघांतील दुराव्याच्या अध्यायावर पूर्णविराम दिला. “राज आणि माझ्यातील अंतरपाट आता दूर झाला आहे. आता अक्षता टाकण्याची वेळ नाही – आम्ही एकत्र आलो आहोत आणि एकत्रच राहणार आहोत,” अशा ठाम शब्दांत त्यांनी संभाव्य युतीचे संकेत दिले.
तसंच, भोंदूबाबांवरही उद्धव ठाकरेंनी घणाघाती टीका केली. “आज अनेक बुवा महाराज लिंब कापण्यात, टाचण्या मारण्यात किंवा अंगारे-धुपारे करत आहेत. पण या अंधश्रद्धांविरोधातच माझे आजोबा – बाळासाहेब ठाकरे – उभे होते. आम्ही त्यांचेच वारसदार आहोत,” असा इशारा देत त्यांनी पुरोगामी भूमिका अधोरेखित केली.
नव्या राजकीय समीकरणांची नांदी?
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने राज्यातील राजकारणात मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक वर्षांच्या दुराव्यानंतर पुन्हा एकत्र आलेल्या या बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा आता केवळ औपचारिकतेची वाट पाहत आहे.