Published On : Mon, Dec 9th, 2019

सोबत या, मानसिकता बदला, शहर नक्की बदलेल…!

– महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : सुयोगनगर उद्यानात ‘वॉक ॲण्ड टॉक विथ मेयर’

नागपूर : समस्या आहेतच. त्याला नकार नाही. त्याचे निराकरण करण्यासाठी यंत्रणा दिवसरात्र झटत आहे. फक्त नागरिकांची सोबत महत्त्वाची आहे. आपण सोबत या. चांगल्या कामाची सुरुवात स्वत:पासून करा. यामुळे संपूर्ण शहराची मानसिकता बदलेल. मानसिकता बदलली की शहर नक्की बदलेल. म्हणून माझे शहर या भावनेने शहर विकासात हातभार लावा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले.

Gold Rate
27 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,100 /-
Gold 22 KT ₹ 1,06,100 /-
Silver/Kg ₹ 1,43,400/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शहरविकासाबाबत शहरातील नागरिकांच्या संकल्पना जाणून घेत त्या दृष्टीने शहरविकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्याच्या हेतूने ‘वॉक ॲण्ड टॉक विथ मेयर’ हा उपक्रम महापौर संदीप जोशी यांनी सुरू केला आहे. याच उपक्रमांतर्गत रविवारी (ता. ८) त्यांनी सुयोगनगर उद्यानात नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नगरसेवक संदीप गवई, नगरसेविका विशाखा मोहोड, जयश्री वाडीभस्मे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. ‘वॉक ॲण्ड टॉक विथ मेयर’ उपक्रमाची संकल्पना महापौर संदीप जोशी यांनी नागरिकांना सांगितल्यानंतर नागरिकांनी सूचना आणि तक्रारी मांडायला सुरुवात केली. हावरापेठपासून छत्रपती चौकापर्यंत आणि अजनीपासून ते मनीषनगर पर्यंतच्या अनेक तक्रारी नागरिकांनी मांडल्या. सुयोगनगर चौकात टीव्हीएस शोरूमसमोर पोलिस नसल्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळते. तेथे दिवसातून किमान दोन-तीन वेळा वाहतूक पोलिस असावेत, अशी विनंती हरिश गुंडावार यांनी केली.

सुयोगनगर परिसरातील गडर लाईनची समस्या भास्कर मोतीखाये यांनी सांगितले. भीमराव लांजेवार यांनीही हीच समस्या सांगत सुयोगनगर उद्यानातील प्रसाधनगृहाची स्वच्छता होत नसल्याचे लक्षात आणून दिले. अतिरिक्त प्रसाधनगृहाची मागणीही त्यांनी केली. सुयोगनगर परिसरात पाईपलाईनसाठी रस्ता खणला मात्र पुनर्भरण झाले नसल्याचे प्रल्हाद खरसने यांनी लक्षात आणून दिले. शताब्दी चौक ते पुरुषोत्तम बाजारपर्यंतच्या ७०० मीटर रस्त्याचे काम झाले नसल्याने या गलिच्छ वस्तीत राहण्याचा अनुभव येत असल्याचे पुंडलिक पिपरे यांनी सांगितले. मनीषनगर-श्यामनगर परिसरातील रस्त्यांची टिप्परमुळे झालेली दुरवस्था आणि निर्माण झालेला अपघाताचा धोका ही गंभीर समस्या भूषण बोबडे यांनी मांडली. सुयोगनगर उद्यान आणि परिसरात रात्री पथदिवे नसल्याने त्रास होतो.

पथदिवे लावण्याची मागणी नंदा तिडके यांनी केली. फुलमती ले-आऊटमध्ये कमी पाणीपुरवठा होत असल्याची समस्या यादव फुलझेले यांनी मांडली. नरेंद्र नगर खाली पावसाळ्याव्यतिरिक्तही पाणी साठत असल्याची समस्या शोभा दाते यांच्यासह अनेक नागरिकांनी मांडली. यावर कायमस्वरूपी उपाय करण्याची विनंती केली. नागरिकांच्या सातत्याने येणाऱ्या तक्रारींची नोंद घेत त्याबाबतचा पाठपुरावा करण्यासाठी नगरसेवकांनी नोंद डायरी ठेवण्याची सूचना विजय माकोडे यांनी मांडली.

याव्यतिरिक्त फुटपाथवरील अतिक्रमण हटवून ते चालण्यायोग्य करण्यात यावे, हनुमान मंदिराजवळील कचराघर हटविण्यात यावे, दोन महिन्यांपासून बंद पडलेले पेव्हर ब्लॉकचे काम सुरू करण्यात यावे, विविध उद्यानांमध्ये लावलेल्या ग्रीन जीमची देखभाल दुरुस्ती व्हावी, सुयोग नगर उद्यानात रात्रीच्या अंधारात दारुड्यांचा धुमाकूळ असतो, प्रेमी युगुलांचेही चाळे चालतात, यावर अंकुल घालण्यात यावा, शताब्दी चौकाच्या रस्त्यावर भरणारा आठवडी बाजार मैदानात हलविण्यात यावा, मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा त्रास दूर करावा, उद्यानाची भिंत उंच करण्यात यावी, सुयोगनगरातील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात वीज पुरवठा देण्यात यावा, हाय टेंशन लाईनच्या तारा खाली आल्या आहेत, त्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उंच करण्यात याव्या, पाळीव कुत्र्यांना घाण करण्यासाठी रस्त्यावर आणले जाते, यासंदर्भात काही धोरण तयार करण्यात यावे, घरासमोर, फुटपाथवर होणाऱ्या पार्किंगचा बंदोबस्त करण्यात यावा, उद्यानाच्या बाजूला असलेल्या टाकीवर जनजागृती संदेश देणारे चित्रण करून परिसराचे सौंदर्य वाढवावे या तक्रारी सूरज कांबळे, समीर दाभाडकर, रविराज अंबडवार, गुलाब मिलमिले, रत्नाकर उत्तरवार, राजेंद्र पिसे, श्री. शिरपूरकर, नरेंद्र काळे, भीमराव मगरे, ॲड. डोहे, प्रमिला साबळे, विजय बोक्षे, डॉ. हरिश मोहिते, बाळकृष्ण पवनीकर, बाबाराम बाथरी, प्रकाश रोडे, श्री. पत्तीवार यांनी मांडल्या.

कर वसुलीच्या कामात आणि मनपाच्या कुठल्याही उपक्रमात ज्येष्ठ नागरिकांची मदत घ्यावी, अशी सूचना ८६ वर्षाचे वृद्ध श्री. पत्तीवार आणि शोभा दाते यांनी मांडली. या सूचनेचे महापौरांसह नागरिकांनीही टाळ्या वाजवून स्वागत केले. उद्यानाची देखरेख आणि सुरक्षा यासंदर्भात धोरण तयार करून एक सूचना फलक अधिकाऱ्यांच्या क्रमांकासह उद्यानाच्या दर्शनी भागात लावण्याची सूचना काही नागरिकांनी केली.

कडक निर्देश आणि तातडीने अंमलबजावणी
नागरिकांच्या सर्व सूचना व तक्रारी ऐकल्यानंतर महापौर संदीप जोशी यांनी तात्काळ काही निर्देश दिलेत. उद्यानाचे धोरण ठरवून सूचना फलक सात दिवसांच्या आता उद्यानासमोर लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. उद्यानातील असामाजिक तत्वांचा त्रास दूर करण्यासाठी लवकरच पोलिस-नागरिक संवाद कार्यक्रम घडवून आणण्याचे त्यांनी आश्वासन दिले. उद्यानात क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल खेळणाऱ्यांना उद्यान विभागातर्फे नोटीस देऊन सात दिवसांचा अल्टिमेटम देण्यात यावा. त्यानंतरही ऐकले नाही तर त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी उद्यान अधीक्षकांना दिले.

उद्यानातील प्रसाधनगृहाची स्वच्छता यापुढे नियमित होईल आणि अतिरिक्त स्वच्छतागृह बांधून देण्याचे आश्वासनही महापौर संदीप जोशी यांनी यावेळी दिले. नरेंद्र नगर पुलाखालील पाण्यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी आर्किटेक्ट आणि इंजिनिअर्स असोशिएशनच्या सदस्यांसोबत बैठक झाली. तेथील दौराही झाला.

लवकरच त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासनही महापौरांनी दिले. ग्रीन जीमची देखभाल दुरुस्ती होणार नसेल तर सर्व देयके अडवून ठेवा. सात दिवसांत दुरुस्ती करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले. आठवडी बाजारासंदर्भात तोडगा काढण्यासाठी नगरसेवकांची बैठक बोलावली असून त्यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सुयोग नगर उद्यानातील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात १२ डिसेंबरपर्यंत वीज पुरवठा सुरू करण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदारांना दिले. फुटपाथवरील आणि शहरातील अतिक्रमण तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. पुढील काही दिवसांत फुटपाथ अतिक्रमणमुक्त होतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

Advertisement
Advertisement