Published On : Tue, Feb 6th, 2018

धर्मनिरपेक्ष घटकांना एकत्र करून हुकूमशाही सरकारविरोधात लढा तीव्र करणार!: खा. अशोक चव्हाण

Advertisement

मुंबई: राज्यातील सर्व धर्मनिरपेक्ष घटकांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष केंद्र व राज्यातील हुकूमशाही मानसिकतेच्या सरकारविरोधातील लढा अधिक तीव्र करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर ते आज टिळक भवन, दादर येथे पत्रकारांशी बोलत होते. बैठकीविषयी माहिती देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, या बैठकीत राज्यातील सामाजिक प्रश्न, राजकीय परिस्थिती आणि सरकारविरोधातील लढ्याच्या पुढील रणनितीबाबत चर्चा झाली. विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि संविधानाच्या रक्षणासाठी सतत कार्यरत असलेल्या संघटनांच्या प्रतिनिधींनी देखील आज काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली. प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याची आर्थिक स्थिती, उद्योग व गुंतवणुकीबाबत सादरीकरण केले. राज्य सरकारने गुंतवणूक, अर्थव्यवस्था आणि रोजगार निर्मितीबाबत केलेल्या दाव्यांचा सावंत यांनी यावेळी पंचनामा केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री सुरेश शेट्टी, आ. नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, आ. मधुकरराव चव्हाण, आ. बसवराज पाटील, माजी खासदार एकनाथ गायकवाड, भालचंद्र मुणगेकर, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. शरद रणपिसे, प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन, आ. भाई जगताप, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे, रामकिशन ओझा आदी उपस्थित होते.

बीड जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

बीड जिल्ह्यातील भाजप नेते दादासाहेब मुंडे यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर टिळक भवन, दादर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन प्रकाश तसेच इतर प्रमुख नेत्यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त बैठक

या बैठकीनंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री जयंत पाटील, आ. जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील समस्या, राजकीय परिस्थिती आणि आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत चर्चा झाली.

बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना खा. अशोक चव्हाण म्हणाले की, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, सरकारची वाढती दडपशाही आदी मुद्द्यांवर सरकारविरोधात संयुक्तपणे लढा देण्याबाबत यावेळी चर्चा झाली. निवडणुकीमध्ये आघाडी करण्याविषयीचा निर्णय केंद्रीय पातळीवर होईल, असे त्यांनी आघाडीसंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.