
नागपूर – राज्यातील हवामानात अचानक बदल जाणवत असून अनेक भागांत थंडीची तीव्र लाट पसरताना दिसत आहे. पुढील काही तास राज्यासाठी अधिक थंड ठरण्याची शक्यता असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारठा वाढण्याचे संकेत आहेत.
कोकण विभाग
कोकण पट्ट्यात थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. मुंबई आणि उपनगरांत हवामान कोरडे राहणार असून किमान तापमानात सुमारे १ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान सुमारे ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र
पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत गारठ्याचा प्रभाव कायम राहणार आहे. नाशिक आणि जळगावमध्ये शीतलहरी जाणवण्याची शक्यता असून सकाळी व रात्री अधिक थंडीचा अनुभव येऊ शकतो.
मराठवाडा विभाग
छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील काही भागांत ढगाळ वातावरण दिसून येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी गारठा थोडा कमी झाला होता, मात्र आता पुन्हा थंडी वाढण्याचे संकेत आहेत. या विभागात किमान तापमान ९ ते ११ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
विदर्भ विभाग
विदर्भातही थंडीचा प्रभाव वाढत असून नागपूरमध्ये किमान तापमान ९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस विदर्भात गारवा कायम राहणार असल्याने नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान थंडीचा जोर लक्षात घेता नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन हवामान तज्ज्ञांनी केले आहे.








