
मुंबई- अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीचा अखेर मुहूर्त ठरला आहे. उद्या 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीची अधिकृत घोषणा करणार आहेत. याबाबतची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
युतीच्या घोषणेपूर्वी सकाळी 11 वाजता दोन्ही ठाकरे बंधू शिवाजी पार्क येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला एकत्र अभिवादन करणार आहेत. त्यानंतर दुपारी 12 वाजता वरळी येथील हॉटेल ब्लू सी येथे संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आहे.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड-
मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही युती जाहीर होणार असून, यामध्ये जागावाटपाबाबतही स्पष्ट भूमिका मांडली जाण्याची शक्यता आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा गटाच्या नेत्यांमध्ये जागावाटपावर चर्चा पूर्ण झाली असून, अंतिम हात फिरवण्यात आल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नाही; एकत्र कामाला सुरुवात
शिवसेना आणि मनसेच्या युतीला दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळाल्याचंही राऊत यांनी सांगितलं. “कार्यकर्त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही. आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून, सर्वजण एकत्र कामाला लागले आहेत,” असं त्यांनी नमूद केलं. वरळीतील डोममध्ये दोन भाऊ एकत्र आल्यानंतरच युती प्रत्यक्षात झाली होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय
ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईसह राज्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होणार असून, शिवसेना-मनसे युतीमुळे ठाकरेंची ताकद लक्षणीयरीत्या वाढणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.








