
नागपूर – नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांची घोषणा होण्याआधीच शहरातील राजकारण तापू लागले आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांत उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असून, इच्छुकांनी तिकीटासाठी सर्व मार्ग खुले केल्याचे चित्र दिसत आहे.
फक्त पक्षाच्या अधिकृत मुलाखती देऊन समाधान न मानता अनेक इच्छुक आता थेट वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. काही प्रभागांत तर कार्यकर्त्यांच्या समर्थकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून आपल्या उमेदवारासाठी शिफारस केल्याची चर्चा आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक ३७ मधील घडामोडींनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी-
दरम्यान, अनेक भागांतून यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची जोरदार मागणी पुढे येत आहे. अनेकदा नगरसेवक राहिलेल्या जुन्या चेहऱ्यांऐवजी तरुण, ऊर्जावान आणि दीर्घकाळ पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुढे आणावे, असा सूर कार्यकर्त्यांमध्ये उमटू लागला आहे. यामुळे पक्ष संघटन मजबूत होईल, असा दावा केला जात आहे.
आमदारांच्या कार्यालयात ‘तिकीट दावेदारांची रांग’
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदारांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात इच्छुक उमेदवारांची वर्दळ वाढली आहे. सकाळपासूनच अनेकजण ‘हजेरी’ लावत असून, आमदारांच्या भेटीसाठी प्रतीक्षा करताना दिसत आहेत. सध्या या कार्यालयांमध्ये सामान्य नागरिकांपेक्षा तिकीटासाठी आग्रही असलेले कार्यकर्ते अधिक असल्याचे चित्र आहे.
आपली निष्ठा अधोरेखित करण्यासाठी काही दावेदार आमदारांच्या कार्यक्रमांचे फोटो, विकासकामांचे पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. डिजिटल प्रचारातून वरिष्ठांचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
जनतेचा पाठिंबा दाखवण्याची धडपड-
रणनीतीचा एक भाग म्हणून अनेक इच्छुकांनी नागरिकांच्या सह्या असलेली समर्थनपत्रे आमदार आणि पक्षनेत्यांकडे सुपूर्द केली आहेत. ‘प्रभागातील जनता आपल्यालाच उमेदवार म्हणून पाहते’ हे दाखवण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. यासोबतच पदयात्रा, छोटेखानी कार्यक्रम, बैठका यांचे फोटो सोशल मीडियावर झळकवत जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला जात आहे.
एकंदर पाहता, नागपूर मनपा निवडणुकीपूर्वीच तिकीटासाठीची राजकीय चढाओढ तीव्र झाली असून, उमेदवारी जाहीर होण्याआधीच अनेक हालचालींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता पक्षश्रेष्ठी कोणावर विश्वास टाकतात, याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.








