नागपूर : मंगळवारी नागपुरात झालेल्या विक्रमी मुसळधार पावसानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. अवघ्या सव्वा तासात ११० मिमी आणि दिवसभरात १८६ मिमी पाऊस झाल्याने निर्माण झालेली परिस्थिती ही बदलत्या हवामानाचा इशारा असल्याचे सांगत, भविष्यात नागपुराच्या जलनिस्सारण व्यवस्थेचे नियोजन नव्याने करावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, नागपुरात एका दिवसात जवळपास पंधरा दिवसांच्या पावसाएवढा पाऊस कोसळला. त्यामुळे शहरातील काही सखल भागांमध्ये पाणी साचले आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांमुळे पाण्याचा निचरा प्रभावित झाला असला, तरी संपूर्ण शहरात तीच परिस्थिती नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूरसारख्या शहरांमधील जलनिस्सारण व्यवस्था मागील २० ते २५ वर्षांच्या पावसाच्या आकडेवारीनुसार उभारण्यात आली आहे. मात्र, एवढ्या कमी वेळात विक्रमी पाऊस झाल्यास कोणतीही यंत्रणा अपुरी पडू शकते. त्यामुळे हवामानातील बदल लक्षात घेऊन नागपुरासह राज्यातील शहरांच्या पायाभूत सुविधांचे नव्याने नियोजन करण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. देशातील तरुणांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्याऐवजी केवळ आरोप-प्रत्यारोप करून अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेतल्याचा दावा करत, जात प्रमाणपत्रांच्या प्रलंबित प्रकरणांवरही सकारात्मक भूमिका घेण्याची ग्वाही त्यांनी दिली.
तसेच, पीक विमा योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात आल्याचे सांगत, त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा स्वतःचा हिस्सा भरावा लागत असल्याने पीक विमा घेणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.





