Published On : Mon, Mar 26th, 2018

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 1,759.71 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मुख्यमंत्र्यांची मंजुरी

  • प्राधिकरणाच्या दुसऱ्या बैठकीत सादर झाला 2018-19चा अर्थसंकल्प
  • रिंग रोड, कचऱ्यापासून इंधन, विविध तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी तरतूद
  • प्राधिकरणाच्या 188 पदांच्या आकृती बंधास मंजुरी


मुंबई: नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सन 2018-19 च्या 1,759.71 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीस मंजुरी देण्यात आली. या वर्षात रिंग रोड जंक्शनवर लॉजिस्टिक पार्क उभारणे, विभागीय कार्यालयांची स्थापना, कचऱ्यापासून इंधन तयार करण्याचा प्रकल्प उभारणे, महानगर क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून देणे, कामठी रोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडर कन्व्हेंशन सेंटर उभारणे, स्वदेश योजनेअंतर्गत दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेसचा विकास, श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान तीर्थस्थळाचा विकास आदी प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात आली आहे. याचबरोबर फुटाळा तलाव परिसराचे सुशोभिकरण करणे, अनधिकृत बांधकामे नियमित करून घेण्यास मुदतवाढ देणे आदी विविध विषयांनाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

यावेळी नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, महापौर नंदा जिचकार, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, समीर मेघे, गिरीश व्यास, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, नागपूर महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त मिलिंद म्हैसेकर, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अश्विन मुद्गल आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नागपूर महानगर विकास प्राधिकरणाने आपल्या क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत किमान 1 लाख घरे बांधण्याचे नियोजन करावे. तसेच या क्षेत्रातील आरक्षित भूखंडावर लक्ष ठेवण्यासाठी MRSAC ची मदत घेऊन यंत्रणा उभी करावी. तसेच या भूखंडांवरील अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना जबाबदारी द्यावी.

प्राधिकरणाने आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात सुधार योजनेतील विविध विकास कामे (70 कोटी), रस्ते व पूलांची कामे (40 कोटी), सांडपाणी व्यवस्थापन (10 कोटी), फुटाळा तलाव येथे संगीत कारंजे व अंबाझरी उद्यान येथे मल्टिमीडिया शो उभारणे (30 कोटी), शासकीय व प्राधिकरणाच्या सहयोगाने श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी तीर्थस्थळाचा विकास (122 कोटी), प्राधिकरणाच्या तरतुदीतून श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानचा विकासासाठी (26 कोटी), चिंचोली येथील शांतीवनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैयक्तिक वापराच्या वस्तूचे जतन व संवर्धनासाठी संग्रहालयाच्या आधुनिकीकरण करणे (28.25 कोटी), स्वदेश योजनेअंतर्गत दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेसचा विकास (30 कोटी), ड्रॅगन पॅलेस परिसरात मूलभूत सुविधा उभारणे (20 कोटी), अल्प उत्पन्न गटासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर बांधणी (700 कोटी), उत्तर नागपूरमधील कामठी रोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडर कन्व्हेंशन सेंटर उभारणे (89.64 कोटी) आदी विविध विकास कामांसाठी तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पाशिवाय नागपूर महानगर क्षेत्राअंतर्गत खडका-किरमीटी-शिवमडका, सुमठाणा-पांजरी आणि सुमठाणा ते परसोडी या दोन योजनांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत वाकी, आदासा, धापेवाडा, पारडसिंगा, छोटा ताजबाग, तेलंगखेडी, गिरडा या धार्मिक सर्किट अंतर्गत तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. फुटाळा तलाव येथे संगीत कारंजे, लाईट साऊंड व लेझर शो तसेच अंबाझरी उद्यान येथे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित लाईट व साउंड व लेझर मल्टिमीडिया शो उभारण्यासही मंजुरी देण्यात आली. महानगर क्षेत्रातील बिना मंजुरी उभारण्यात आलेल्या भूखंड/अभिन्यास/बांधकामे यांना प्रशमन संरचना म्हणून घोषित करण्यासाठी अर्ज स्विकारण्याची मुदत 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत वाढविण्यासही यावेळी मंजुरी देण्यात आली. तसेच प्राधिकरणाच्या 188 पदांच्या आकृतीबंधास यावेळी मंजुरी देण्यात आली.