Published On : Sun, Aug 26th, 2018

ऑरेंज सिटी स्ट्रीटसह विविध विकास प्रकल्पांचे प्रस्ताव प्राधान्याने सादर करा

Advertisement

नागपूर: शहरातील विविध विकास प्रकल्पांच्या कामांना गती देताना ऑरेंज सिटी स्ट्रीट, मिहान येथे कन्व्हेन्शन सेंटर, ॲग्रो व्हिजन कन्व्हेन्शियल सेंटर आदी विकास प्रकल्पासोबत मेट्रो व महानगरपालिकेतर्फे शहरातील यशवंत स्टेडियम, संत्रा, कॉटन मार्केट तसेच अंबाझरी ओपन थिएटरसारख्या जागतिक दर्जाच्या सुविधा असलेल्या प्रकल्पांचे प्रस्ताव कालबद्ध कार्यक्रमानुसार पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या.

रामगिरी येथे नागपूर शहरातील विविध विकास प्रकल्पांचा आढावा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. ऑरेंज सिटी स्ट्रीट (लंडन स्ट्रीट) हा प्रकल्प कालबद्ध कार्यक्रमानुसार पूर्ण करावयाचा असल्यामुळे शासनासह विविध विभागांच्या आवश्यक मान्यतेसाठीचे प्रस्ताव एक आठवड्यात सादर करण्याच्या सूचना यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

Advertisement
Advertisement

यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर श्रीमती नंदाताई जिचकार, खासदार विकास महात्मे, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, नागो गाणार, डॉ. मिलिंद माने, नागपूर मेट्रोचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक ब्रृजेश दीक्षित, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, मिहानचे उपाध्यक्ष सुरेश काकाणी, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त रविंद्र कुंभारे, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्री. देबडवार आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

ऑरेंज सिटी स्ट्रीट हा प्रकल्प महानगरपालिकेच्या मालकीच्या 30.49 हेक्टरवर राबविण्यात येत असून या प्रकल्पांतर्गत हॉस्पिटल, मेडिकल हब, सराफा व्यवसाय आदी वाणिज्यिक वापरासोबतच रहिवासी तसेच मनोरंजन आदी सुविधा इथे निर्माण करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाला 2 हजार 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या प्रकल्पाचे काम प्राधान्याने पूर्ण करायचे आहे. या प्रकल्पासाठी महानगरपालिका तसेच नागपूर सुधार प्रन्यास व मेट्रो यांची संयुक्त बैठक घेवून आर्थिकदृष्ट्या हा प्रकल्प स्वयंपूर्ण होईल यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी दिल्या.

लंडन स्ट्रीट हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी तसेच जगातील सर्वोत्कृष्ट प्रकल्प म्हणून विकसित करताना व्यावसायिक तसेच येथील रहिवाश्यांना चांगल्या व दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करावा. तसेच शासनाच्या मान्यतेसाठी एकत्र प्रस्ताव तात्काळ करुन या प्रकल्पाचे भूमिपूजन लवकर कसे करता येईल. यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.

शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या मार्केटच्या जागांचा विकास करताना नागपूर मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून सदर येथील गोल मार्केट, बर्डी येथील नेताजी मार्केट, संत्रा मार्केट, अंबाझरी ओपन थिएटर तसेच मानस चौक यांचा विकास कसा करता येईल यासंदर्भातही नागपूर मेट्रोतर्फे यावेळी सादरीकरण करण्यात आले. या संपूर्ण शहरातील महत्त्वाच्या जागांचा विकास करताना जागेचे हस्तांतरण तसेच मेट्रो व महानगरपालिका यांनी संयुक्तपणे प्रकल्प राबवून महानगरपालिकेला आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होईल अशा दृष्टीने प्रकल्पाची आखणी करावी. अशी सूचना करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, नेताजी मार्केट, कॉटन मार्केट, संत्रा मार्केट, रेल्वे स्टेशन येथील जागेचा विकास करताना येथे सध्या सुरु असलेल्या दुकानदारांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात प्राधान्याने नियोजन करावे. विकास करताना आवश्यक वाहनतळ व्यवस्था तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही. तसेच नागरिकांनाही सर्व सुविधा उपलब्ध होतील. यादृष्टीने नियोजन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

फुटाळा तलाव परिसराचा विकास करताना चार ते पाच हजार प्रेक्षक बसू शकतील अशा प्रकारची लेक व्ह्यू गॅलरी, शॉपिंग एरिआ, वाहनतळासाठी संपूर्ण व्यवस्था तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे तळ म्हणून फुटाळा तलावाचा विकास यादृष्टीने नियोजन करावे. यासाठी केंद्र शासनातर्फे 112 कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. यशवंत स्टेडियम, इतवारी येथील किराना मार्केट, अंबाझरी येथील ओपन थिएटरच्या बांधकामासंदर्भातही सादरीकरण यावेळी करण्यात आले.

मिहान परिसरात जागतिक दर्जाच्या सर्व सुविधा असलेले अत्याधुनिक कन्व्हेन्शन सेंटरच्या बांधकामासंदर्भात यावेळी सादरीकरण करण्यात आले. हे कन्व्हेन्शन सेंटर सुमारे 108 हेक्टर जागेवर प्रस्तावित असून एकाच वेळी 10 हजार व्यक्ती बसू शकतील अशी सुविधा उपलब्ध राहणार असून देशातील व विदेशातील उद्योजक, नागरिक, खेळाडू आदींचे आकर्षण ठरेल यादृष्टीने नियोजन करावे, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. कन्व्हेन्शन सेंटरसाठी आवश्यक ते संपूर्ण सहाय्य केंद्र व राज्य शासनाकडून देण्यात येईल. यासाठी ट्रायकॉनतर्फे सुंदर व आकर्षक आराखडे तयार करण्यात आले आहेत. नागपूरचे व सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेले श्री. काळे यांनी या संपूर्ण कन्व्हेन्शन सेंटरचा आराखडा तयार केला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

इलेक्ट्रिक बसला प्राधान्य

बस वाहतूक अत्यंत सुलभ व कमी खर्चात तसेच नागरिकांनाही सुलभपणे प्रवास करता येईल यादृष्टीने इलेक्ट्रिस बसच्या प्रस्तावास तत्वत: मान्यता देण्यात आली. ओलेक्ट्रा ग्रीन टेक लिमिटेडतर्फे इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या बसचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. प्रदूषण विरहित असलेली इलेक्ट्रिक बस इंधनापेक्षा कमी खर्चाची असल्यामुळे या प्रस्तावाला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक बस वातानुकुलित असून भाडेसुद्धा कमी राहणार असल्यामुळे बस चालविण्यासंदर्भात संबंधित कंपनीच्या सकारात्मक व योग्य दराचा प्रस्ताव सादर केल्यास राज्यात इलेक्ट्रिक बस चालविण्यात येईल, असे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नागपूर शहरातील विविध विकास कामासंदर्भात नागपूर मेट्रो, महानगरपालिका आदी संस्थांनी यावेळी सादरी करण केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement