Published On : Thu, Jan 11th, 2018

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर मार्गात केबल, सुदैवाने दुर्घटना टळली

CM's Chopper
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे लागलेला हेलिकॉप्टर त्रासाचा ससेमीरा कायम आहे. आज मुंबईजवळच्या भाईंदरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं लँडिंग सुरु होतं. मात्र हेलिकॉप्टर मार्गात केबल आल्याने ते पुन्हा वर घेण्यात आलं, त्यामुळे संभाव्य अपघात टळला.

आज भाईंदर येथे एस.के स्टोन चौकीजवळ भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण येथील घोडबंदर इथल्या वर्सोवा पुलाच भूमीपूजन, तसेच इतर विकास कामांचंही भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.

यावेळी मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी हे दुपारी एकच्या दरम्यान मुंबई येथील एक कार्यक्रम आटोपून हेलिकॉप्टरने भाईंदरच्या सेवन इल्वेन शाळेत उतरणार होते. त्यावेळी शाळेच्या इमारतीतून दुसऱ्या इमारतीवर केबलची वायर गेली होती. हेलिकॉप्टर उतरत असताना हेलिकॉप्टर पायलटला अचानक ती केबल दिसली. पायलटने हेलिकॉप्टर लॅंड होत असताना ते पुन्हा टेकऑप केलं.

जर हेलिकॉप्टर खाली आलं असतं, तर हेलिकॉप्टरच्या पंख्यात वायर अडकून अनर्थ घडला असता.

यावेळी हेलिकॉप्टरमध्ये नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री होते.

याप्रकरणी ग्राऊंड इंजिनिअरला निलंबित करण्यात आलं आहे. तर कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांनी मुंबईला रस्तेमार्गे रवाना होणं पसंत केलं.

मुख्यमंत्री आणि हेलिकॉप्टरचं विघ्न

लातूर – 25 मे 2017

लातूरहून मुंबईकडे येण्यासाठी टेक ऑफ घेतल्यानंकतर काही क्षणातच कोसळलं.

अलिबाग – 7 जुलै 2017

हेलिकॉप्टर लँडिंग मार्कच्या पुढे सरकल्यानं मागील पाते मुख्यमंत्र्यांचा डोक्याला लागण्याचा धोका उद्भवला

नाशिक – 9 डिसेंबर 2017

हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर क्षमतेपेक्षा अधिक वजन झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं

भाईंदर – 11 जानेवारी 2018

हेलिकॉप्टर मार्गात केबल आल्याने लँडिंग होणाऱ्या हेलिकॉप्टरने पुन्हा टेक ऑप केलं.