Published On : Fri, Sep 15th, 2017

स्वच्छता हाच खरा सेवाधर्म : महापौर नंदा जिचकार

Advertisement

नागपूर: जेथे स्वच्छता असे तेथे आरोग्य वसे, हे ब्रीद लक्षात ठेवून आपल्या शहराच्या स्वच्छतेसाठी प्रत्येक नागरिकाने आता पुढाकार घ्यायला हवा. शहरात स्वच्छता राहिली तर शहराचे आरोग्य सुदृढ राहील. त्यामुळे स्वच्छता हाच खरा सेवाधर्म समजून स्वच्छतेच्या दिशेने पाऊल टाकायला हवे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहीम १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा ई-शुभारंभ शुक्रवार (ता.१५) ला मनपा मुख्यालयात महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते, आयुक्त अश्विन मुदगल यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. महापौर नंदा जिचकार पुढे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ अभियानाची मुहूर्तमेढ तीन वर्षांपूर्वी रोवली. या अभियानाअंतर्गत तीन वर्षात देशभरात अभियानांतर्गत व्यापक जनजागृती आणि कृती झाली. पुढील पंधरवाड्यात ‘स्वच्छता हीच सेवा’ हा कार्यक्रम आखण्यात आला असून यामध्ये नागरिकांनी आणि समाजातील प्रत्येक घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आयुक्त अश्विन मुदगल यांनीही या अभियानाचे महत्त्व सांगितले. नागपूर शहराला स्वच्छतेच्या बाबतीत देशातील पहिल्या पाच क्रमांकात आणण्याचा संकल्प या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण करू या. समाजातील प्रत्येक घटकाचा यात सहभाग असेल तर हे सहज शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
या मोहिमेअंतर्गत सेवा दिवस, समग्र स्वच्छता दिवस, सर्वत्र स्वच्छता दिवस, श्रेष्ठ स्वच्छता दिवस साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत शहरातील विविध घटकातील समुदायांना एकत्रित करून त्यांना श्रमदानात सहभागी करून घेणे, शहरातील हॉस्पीटल, उद्याने, पुतळे व स्मारक यांची स्वच्छता करणे तसेच शहरातील ऐतिहासिक ठिकाणांची व प्रसिद्घ स्थळांची स्वच्छता करणे आदी कार्यक्रम अंतर्भूत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाला नगरसेवक मनोज सांगोळे, जितेंद्र घोडेस्वार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त रवींद्र देवतळे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस उपस्थित होते.

दहा झोनमध्ये ‘स्वच्छता’ कार्यक्रमाने शुभारंभ

नागपूर महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या दहाही झोनमध्ये झोन मुख्यालय परिसरात स्वच्छता कार्यक्रम राबवून ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी झोन सहायक आयुक्तांसह तेथील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सेवा दिवस, समग्र स्वच्छता दिवस, सर्वत्र स्वच्छता दिवस, श्रेष्ठ स्वच्छता दिवस या अंतर्गत झोनस्तरावरही कार्यक्रम होणार आहेत.