Published On : Mon, Jan 28th, 2019

स्वच्छ सर्वेक्षणानंतरही स्वच्छतेची कामे सुरुच ठेवा : पालकमंत्री

Advertisement

– हनुमाननगर जनसंवाद कार्यक्रम
– नागरिकांचे सहकार्य पण प्रशासन थंड
– म्हाडाबद्दल तीव्र संतप्त भावना
– अतिक्रमण, गडरलाईनच्या तक्रारी अधिक
– बगिचे, मोकळ्या जागांवर सीसीटीव्ही लावा
– नासुप्रबद्दल 13 तक्रारी

नागपूर: एकीकडे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत मनपा सहभागी झाली असताना दुसर्‍या बाजूला कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी येत असतानाही कारवाई केली जात नाही. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा संपल्यानंतरही या संदर्भातील कारवाई व कामे सुरुच ठेवा. स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामात नागरिकांचे सहकार्य मिळत आहे. पण प्रशासनाने जर दिरंगाई, उदासीनता केली आणि शहराचा क्रमांक गेला तर कारवाईशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जनसंवाद कार्यक्रमात अधिकार्‍यांना दिला.

हनुमाननगर झोनमध्ये हा कार्यक्रम आज 4 तास चालला. या प्रसंगी व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, सभापती रुपाली ठाकूर, नगरसेवक भगवान मेंढे, सतीश होले, दीपक चौधरी, श्रीमती कुंभलकर, आयुक्त अभिजित बांगर व अन्य अधिकारी उपस्थित होते. स्वच्छतेचे सर्वेक्षण झाल्यानंतर स्वच्छतेची कामे थंडबस्त्यात पडली असल्याचे दिसत आहे. मागील वेळी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहराचा नंबर गेला. पण यावेळी असे होता कामा नये, असे सांगताना पालकमंत्री बावनकुळे यांनी मोकाट कुत्र्यांवर काय कारवाई केली असा प्रश्न उपस्थित केला. मुंबई आणि पुणे मनपा आयुक्तांनी ज्याप्रमाणे उपाययोजना केल्या त्याप्रमाणे उपाय करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. प्रत्येक झोनमध्ये मोकाट कुत्र्यांची नसबंदी करणारे केंद्र निर्माण करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

कार बाजारचे अतिक्रमण
शाळेच्या परिसरातील, फुटपाथवरील अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करण्याची मागणी अनेक नागरिकांनी केली. गुरुदेवनगर, आशीर्वादनगर, ग्रेटनाग रोड, नंदनवन या भागातील नागरिक अतिक्रमणामुळे त्रस्त असल्याच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या. तसेच रस्त्याच्या कडेला विक्रीसाठी उभ्या करण्यात आलेल्या चारचाकी गाड्यामुळे (कार बाजार) नागरिक अधिक त्रस्त असल्याचे या कार्यक्रमात सांगितले जात होते. यावर अतिक्रमण हटविण्याची कारवाई सतत सुरु ठेवा व पुन्हा अतिक्रमण होऊ देऊ नका असे निर्देश सहायक आयुक्तांना देण्यात आले.

गडर लाईन झाल्या चोक
हुडकेश्वर नरसाळा या भागातील गडर लाईनसाठ़ी 200 कोटींचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती याप्रसंगी मनपातर्फे देण्यात आली. याशिवाय अयोध्यानगर, म्हाळगीनगर, हुडकेश्वर, मानेवाडा, विणकर कॉलनी याशिवाय अन्य भागात गडर लाईन चोकेज व नादुरुस्त असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. अनेक नागरिकांच्या विहिरीतील पाणी गडरलाईन फुटल्यामुळे दूषित झाल्याचेही सांगण्यात आले. 1960 पूर्वीची गडर लाईन नेहमीच चोक होत असते. येत्या 6 महिन्यात ही गडर लाईन नवीन टाकण्यात येणार असल्याची माहिती मनपातर्फे सांगण्यात आली.

खुल्या भूखंडावर फलक लावणार
झोनमध्ये खुल्या भूखंडांची साफसफाई होत नसल्यामुळे व साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना डासांचा प्रचंड त्रास असून खुल्या भूखंड धारकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. खुल्या भूखंडांवर मनपाच्या मालकीचे फलक लावा आणि जेव्हा भूखंड मालक येईल तेव्हा त्याच्याकडून साफसफाईचा खर्च वसूल केला जाणार आहे. सर्व खुल्या भूखंडांवर असे फलक मनपा लावणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. उमरेड नपने ज्याप्रमाणे उपाययोजना केल्या त्याप्रमाणे उपाययोजना करण्याची सूचना पालकमंत्री बावनकुळे यांनी केली.

म्हाडाबद्दल तीव्र संताप
म्हाडाच्या कॉलनींमध्ये राहणार्‍या नागरिकांनी म्हाडाच्या कार्यालयात भूभाटकाची डिमांड नोट देण्यासाठी पैशाची मागणी केली जाते. पैसे दिल्याशिवाय लीज नूतनीकरण होत नसल्याचे सांगण्यात आले. तसेच म्हाडातर्फे घरकुलाची खरेदी करून दिली जात नसल्याचेही सांगण्यात आले. म्हाडाची कोणतीच सेवा नागरिकांना चांगली मिळत नाही. म्हाडाच्या तक्रारींबाबत पालकमंत्र्यांनी एक स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत चार विषय प्रामुख्याने घेण्यात येणार आहेत.

शिक्षणाच्या दर्जासाठी धोरण करा
मनपाच्या शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी एक धोरण तयार करून बंद पडलेल्या व पटसंख्या कमी झालेल्या शाळा खाजगी संस्थांना देण्याबद्दल एक धोरण तयार करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी आयुक्तांना दिल्या. सध्या विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी नाही, गणवेष नाही, पटसंख्या नाही आणि दुसर्‍या बाजूला मनपा शिक्षकांना आदर्श शिक्षकांचा पुरस्कार दिला जातो, अशा भावना महेश महाडिक या तरुणाने व्यक्त केल्या. तसेच कमला नेहरू महाविद्यालयात शिक्षणाच्या सवलतीं घेत इमारतीचा वाणिज्यिक वापर केला जात असल्याचेही त्याने मनपाच्या निदर्शनास आणून दिले.

बगिच्यांमध्ये सीसीटीव्ही टॉवर
झोनमधील बगिचे आणि मोकळ्या जागांवर सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. बगिच्यांमध्ये रोडरोमियोंचा अधिक त्रास असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून आल्या. झोनमध्ये 7 बगिच्यांमध्ये 7 टॉवर लावण्यात येणार आहे. मोकळ्या मैदानांचा विकास करण्यासाठी मिळालेल्या निधीतून हे काम करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
याशिवाय नाल्यवरील भिंती, भूखंडांचे आरएल पत्र, अवैध मोबाईल टॉवर, पाण्याची पाईपलाईन टाकणे, झाडे झुडपे काढणे, रस्त्यावरील पथदिवे, मालमत्ता पत्रक मिळणे, या तक्रारी जनसंवाद कार्यक्रमात करण्यात आल्या.

आणि त्यांना रडू कोसळले
पाण्याच्या कनेक्शनसाठी एक नागरिक संतप्त होऊन तक्रार मांडत असताना भावना अनावर होऊन त्याला रडू कोसळले. घराचे सर्व कागद माझ्या नावाने ??हेत, ग?%?ल्या काही महिन्यांपासून आपण पाण्याचे कनेक्शन ओसीडब्ल्यूला मागत आहोत. पण कनेक्शन मिळत नाही. यावर ओसीडब्ल्यूतर्फे सांगण्यात आले की, आम्ही कनेक्शन देण्यास गेलो होतो, पण संबंधितांचे भाऊ कनेक्शन देऊ देत नाही. आता पोलिस संरक्षण घ्या आणि 15 दिवसात पाण्याचे कनेक्शन देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी ओसीडब्ल्यूला दिले.