Published On : Sat, Jun 15th, 2019

स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून नागपूर स्वच्छ-सुंदर करा : महापौर नंदा जिचकार

स्वच्छ सर्वेक्षण तयारीसाठी आढावा बैठक : जोमाने कामाला लागण्याचे निर्देश

Mayor Nanda Jichkar

नागपूर : स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या माध्यमातून शहराशहरांमध्ये स्वच्छतेसाठी स्पर्धा जरी घडविली जात असेल तरी स्वच्छता ही नागरिकांची सवय बनायला हवी. यासाठी यंत्रणेची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. यंदाचे स्वच्छ सर्वेक्षण केवळ एक महिन्यापुरते मर्यादित नसून नऊ महिने सतत याबद्दल माहिती पाठवायची आहे. त्यामुळे जोमाने कामाला लागा. या अभियानाच्या माध्यमातून नागपूर स्वच्छ-सुंदर करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी केले.

स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात शुक्रवारी (ता. १४) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे, आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, नगरसेवक मनोज सांगोळे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, स्वच्छ भारत अभियान मनपाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार पुढे म्हणाल्या, स्वच्छ सर्वेक्षण दरवर्षीप्रमाणे यावेळी वेगळ्या पद्धतीने आहे. स्वच्छतेचे कार्य यंत्रणेनेही जोमाने करायला हवे. नागरिकांमध्ये याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. यावेळी प्रथम दहा शहरांच्या यादीत नागपूर शहर यायलाच हवे, यादृष्टीने तयारी करण्याचे निर्देशही महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

आयुक्त अभिजीत बांगर म्हणाले, यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत तीन टप्प्यात अहवाल सादर करावयाचा आहे. एप्रिल ते जून, जुलै ते सप्टेंबर आणि आक्टोबर ते डिसेंबर अशा पद्धतीने शहरातील स्वच्छताविषयक प्रगतीचा आणि कार्याचा अहवाल पाठविणे अनिवार्य आहे. कामाच्या टक्केवारीप्रमाणे एकूण ६००० गुणांपैकी १५०० गुण यावर देण्यात येतील. या गुणांच्या आधारांवर शहरांची क्रमवारी ठरविण्यात येईल. स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत जे निकष देण्यात आलेले आहेत, त्या प्रत्येक निकषांवर कार्य होणे आवश्यक आहे. घरगुती शौचालयाचे काम दहा दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी दिले.


उघड्यावर लघवी ज्या ठिकाणी नागरिक करतात त्या जागा शोधून काढण्यात याव्या आणि तेथे मुतारी बांधण्यात यावी, मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या प्रतिष्ठान व मोठ्या सोसायट्यांना त्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट स्वत:च लावायची आहे तर छोट्या सोसायटी आणि अन्य नागरिकांनीही आपल्या घरी निर्माण होणारा कचरा विलग करून मनपाच्या यंत्रणेकडे द्यायचा आहे. ह्या कार्यावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

तत्पूर्वी स्वच्छ भारत अभियानांतर्गत होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणचे निकष काय, कुठल्या कार्यावर किती गुण देण्यात येणार आहे याबाबतची सविस्तर माहिती स्वच्छ भारत मिशन सेलचे अनित कोल्हे यांनी सादरीकरणाद्वारे दिली. बैठकीला सर्व झोनचे सहायक आयुक्त, झोनल अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.