Published On : Tue, May 23rd, 2017

पावसाळ्यापूर्वी नद्या स्वच्छ करा : महापौर


नागपूर:
पावसाळ्यापूर्वी शहरातील तिन्ही नद्यातील गाळ काढून त्या स्वच्छ करा जेणेकरून पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. नाग नदी, पोरा नदी, पिवळी नदी येथे सुरू असलेल्या स्वच्छता अभियानाच्या पहाणीप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी नागपूर महानगर पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, हनुमाननगर झोन सहायक आय़ुक्त राजु भिवगडे आदी उपस्थित होते.

या पाहणी प्रसंगी महापौर म्हणाल्या, नद्यातील सर्व गाळ काढून नद्याचे प्रवाह मोकळे करा, जूनपर्यंत ही मोहीम कायम राहू देण्याचे आदेश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

नागपूर महानगरपालिकेने नागनदीचे पुनरूज्जीवन व सौंदर्यीकरण करण्याचा संकल्प केला आहे. त्या अनुषंगाने १७ एप्रिल ते २७ मे या दरम्यान हे अभियान राबविण्यात येत आहे. नदी स्वच्छता अभियानाअंतर्गत नागपूर शहरातील नागनदी, पिवळीनदी, पोरा नदी स्वच्छ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मागील वर्षी या अभियानाअंतर्गत दोन लाख टन गाळ काढण्यात आला होता. यावर्षी त्यापुढील काम अपेक्षित आहे. नदीच्या पाण्याची पातळी समतल करण्याचे काम सध्याच्या स्थितीत सुरू असून त्यातून गाळ काढण्यात येत आहे. ही सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण होईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.


मानेवाडा-बेसा रोड येथील पोरा नदी, जुनी शुक्रवारी येथील नागनदी त्याचप्रमाणे नारा घाट येथील नागार्जून कॉलनीमध्ये पिवळी नदीवर सुरू असलेल्या स्वच्छता कामाचा आढावा महापौरांनी घेतला आणि समाधान व्यक्त केले.

या पाहणीप्रसंगी हनुमाननगर झोनचे झोनल अधिकारी दिनेश कलोडे, उपअभियंता कृष्णकुमार हेडाऊ, गांधीबाग झोनचे विभागीय अधिकारी पी.डी.बांबोडे, अभियंता सतीश नेरळ, धंतोली झोनचे स्वास्थ निरीक्षक गोविंद खरे, कनिष्ठ अभियंता भांडारकर उपस्थित होते.