Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, May 16th, 2018

  स्वच्छ सर्वेक्षण २०१८ : नागपूर शहराला नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैलीचा पुरस्कार

  मुंबई: स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र हे देशात स्वच्छतेच्या कामगिरीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. महाराष्ट्रातील ९ शहरांना स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला असून, देशात सर्वाधिक १० पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभियानात सहभागी झालेल्या संस्था, कार्यकर्ते आणि नागरिकांसह त्याची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचे त्यांनी अभिनंदन केले आहे.

  आज नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत गृहनिर्माण व नागरी व्यवहार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीपसिंग पुरी यांनी याबाबत घोषणा केली.

  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात केली. या अभियानाअंतर्गत शहरी भागातील स्वच्छतेचे मूल्यांकन करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ४ जानेवारी २०१८ ते १० मार्च २०१८ या कालावधीत देशातील ४२०३ शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते.

  या स्पर्धेत झारखंड राज्याने सर्वोकृष्ट राज्याचे पहिले पारितोषिक मिळवले तर महाराष्ट्राला दुसरा क्रमांक तर छत्तीसगढला तिसरा क्रमांक मिळविला आहे. तर देशात स्वच्छ शहराचा मान इंदौर शहराने मिळविला आहे.

  वेगवेगळ्या विभागात राज्यातील नऊ शहरांना स्वच्छ शहरांचे सर्वोकृष्ट पारितोषिके जाहीर झाली आहेत.

  महाराष्ट्रातील ९ शहरांना स्वच्छता पुरस्कार
  स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रातील ९ शहरे स्वच्छ शहरे ठरली असून यातील ६ शहरांना राष्ट्रीय स्तरावरील स्वछता पुरस्कार जाहीर झाला आहे तर ३ शहरांना विभागस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

  नागपूर शहराला नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैलीचा पुरस्कार
  नागपूर हे शहर स्वच्छ सर्वेक्षणात देशातील नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैली असणारे शहर ठरले आहे, तर नवी मुंबई हे शहर घनकचरा व्यवस्थापनात देशातील सर्वोत्तम ठरले आहे.

  परभणी ठरले नागरिक प्रतिसादात देशात अव्वल
  मराठवाड्यातील परभणी हे शहर स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांच्या प्रतिसादात उत्कृष्ट ठरले आहे, तर भिवंडी शहरास गतिमान मध्यम शहर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

  बृहन्मुंबई शहराला स्वच्छता पुरस्कार
  राज्याची राजधानी असलेल्या शहरांना स्वच्छ सर्वेक्षणात पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये बृहन्मुंबई शहरास सर्वोत्कृष्ट राजधानीचे स्वच्छ शहर असा पुरस्कार जाहीर झाला आहे. भुसावळ शहरास गतिमान लहान शहर हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

  महाराष्ट्राला विभागस्तरीय ३ पुरस्कार
  देशातील विभागनिहाय पुरस्कारात महाराष्ट्राला पश्चिम विभागात ३ पुरस्कार जाहीर झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहराला पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहराचा पुरस्कार जाहीर झाला आहे.नागरिक प्रतिसादाच्या बाबतीत दिला जाणारा पुरस्कार अमरावती जिल्ह्यातील शेंदुरजना घाट या शहराला मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील सासवड या शहराला नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैलीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

  स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या आज जाहीर करण्यात आलेल्या निकालाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला असून या अभियानात सहभागी झालेल्या संस्था, कार्यकर्ते आणि नागरिकांसह त्याची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचे त्यांनी अभिनंदन केले आहे. स्वच्छ भारत अभियानातील राज्यातील शहरांचे यश हे उत्साहवर्धक असून याअंतर्गंत शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागात लक्षणीय काम झाले आहे. महाराष्ट्र हे देशात स्वच्छतेत लवकरच अव्वल क्रमांक गाठण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145