Published On : Wed, May 16th, 2018

पारंपरिक शेती पद्धतीला कृषी पर्यटनाची जोड आवश्यक – कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर

Advertisement

मुंबई: ग्रामीण भागातील पारंपरिक शेतीला कृषी पर्यटनाची जोड मिळाली तर शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी पारंपरिक कृषी पद्धती जपून कृषी पर्यटनाला वाव देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले.

जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कृषी पर्यटन विकास संस्थेमार्फत येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आज एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पर्यटनमंत्री जयकुमार रावल, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, एमटीडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, कृषी पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष भगवानराव तावरे, कार्यक्रमाचे संयोजक पांडुरंग तावरे आदी यावेळी उपस्थित होते.

देशाच्या विकासात कृषी पर्यटन महत्त्वाचा सहभाग देईल – पर्यटनमंत्री जयकुमार रावल
स्वित्झरलँड, मलेशिया, थायलंड या देशांच्या विकासामध्ये कृषी पर्यटन क्षेत्राचा मोठा वाटा आहे. यामुळे त्या देशाच्या जीडीपीमध्ये वाढ होते. आपणही अशा विकसित देशाची कृषी पर्यटन प्रणाली अंगीकृत करून देशाच्या विकासामध्ये वाढ होण्यास मदत करू शकतो, असे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी सांगितले. राज्यात सध्या ५०० च्या वर कृषी पर्यटन केंद्रे आहेत. राज्यातील जवळपास २० लाख पर्यटक हे कृषी पर्यटन केंद्राचा लाभ घेत आहेत. भविष्यात ही संख्या वाढणे गरजेचे आहे. यासाठी पर्यटन विभागामार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे पर्यटनमंत्री श्री. रावल यांनी सांगितले.

राज्यमंत्री श्री. खोत म्हणाले, आगामी काळात कृषी पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन देश परदेशातून पर्यटक आकर्षित व्हावेत व स्थानिकांना, तरूणांना व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेती उत्पन्नात भर पडेल या दृष्टीने वस्तुस्थितीवर आधारित आराखडा तयार करणे आवश्यक आहे. यापुढील काळात कृषी व कृषी पर्यटनविषयक बाबींच्या बैठका प्रत्यक्ष त्या त्या विभागातील कृषी पर्यटन केंद्राच्या ठिकाणीच स्वत: घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

श्री. खोत म्हणाले, आपल्या राज्यातील भौगोलिक परिस्थिती, नैसर्गिक साधनसंपदा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने करण्यात येणारी शेती, जैव वैविधता याचा पुरेपूर वापर करून अचूक नियोजन केल्यास आपल्याला परदेशी जाण्याची आवश्यकता पडणार नाही, इतर राज्यातील तसेच परदेशी पर्यटक राज्याच्या विविध भागात पर्यटन करतील, असे ते म्हणाले.

पालघर जिल्ह्यातील हार्मोनी व्हिलेज, ढेपेवाडा (जि. पुणे), सिट्रस फार्म्स (अमृतसर, पंजाब), दाजी नि वाडी (सुरत, गुजरात), महाजन वावर (नागपूर) या पर्यटन विषयक प्रकल्पांना यावेळी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.