बारामती: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचालींना वेग आला आहे. बारामती मतदारसंघात शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या आहेत.
आज बारामतीच्या प्रत्येक गावामध्ये अनोळखी लोक फिरताना दिसत आहेत आणि वेगळ्या भाषेत बोलताना दिसत आहेत. शेवटच्या दोन-तीन दिवसांमध्ये धनशक्तीचा आणि दडपशाहीचा वापर होईल,असा दावा आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी केला आहे.
बारामती तालुक्यातील जळगाव सुपे गावात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्त झालेल्या सभेत सुनंदा पवार बोलत होत्या.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली. ही लढत नणंद भावजयाची असल्याने अटीतटीचा सामना पाहायला मिळेल.