Published On : Mon, Jul 27th, 2020

नागरिकांनी अशीच जीवनशैली अंमलात आणावी!

Advertisement

आयुक्त तुकाराम मुंढे : नियम आणि दिशानिर्देश पाळण्याचे आवाहन

नागपूर : नागपुरात २५ आणि २६ जुलै रोजी पाळण्यात आलेल्या ‘जनता कर्फ्यू’च्या निमित्ताने नागरिकांनी आपण मनात आणले तर काहीही करु शकतो, हे दाखवून दिले आहे. याच पद्धतीची जीवनशैली भविष्यात प्रत्येकाने अंमलात आणावी. आपल्याला कोरोनावर कर्फ्यू लावायचा आहे आणि स्वत:ला अनलॉक करायचे आहे. त्यामुळे स्वत:ला अनलॉक करताना नियमांचे बंधन स्वत:वर ठेवावे, असे प्रतिपादन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शहरात पुन्हा लॉकडाऊन करावे की नाही यावर मत-मतांतरे सुरू होते. दरम्यान, दोन दिवस जनता कर्फ्यूची संकल्पना समोर आली. नागपूरकरांनी या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. व्यापाऱ्यांचे आणि सर्व नागरिकांचेही यासाठी कौतुक करायलाच हवे. मात्र या दोन दिवसानंतर नागरिकांनी पुन्हा गर्दी करु नये. जे नियम कोव्हिड-१९ चे संक्रमण थांबविण्याच्या दृष्टीने आखून देण्यात आले आहेत, त्या नियमांचे उल्लंघन होणार नाही आणि शासनाच्या दिशानिर्देशाचे पालन होईल, याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी.

चेहऱ्यावर मास्क असावा, दुकानात पाच पेक्षा अधिक व्यक्ती असू नये. शारीरिक अंतराचे पालन व्हायला हवे. त्याची काळजी दुकानदारांनी घ्यायला हवी. प्रत्येक दुकानात सॅनिटायझरची व्यवस्था असायलाच हवी. दुकानासंदर्भात असलेल्या सम-विषम नियमाचे पालन व्हावे. सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेतच दुकाने उघडी असायला हवी. दुचाकीवर एका व्यक्तीपेक्षा अधिक व्यक्ती असू नये. चार चाकीमध्ये टू प्लस वन हा नियम पाळायला हवा. विनाकारण घराबाहेर पडू नये. नको तेथे गर्दी करु नये, हे नियम आपण आजपासून स्वत:हून अंगिकारले तर लॉकडाऊनची गरज मुळीच पडणार नाही. आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत ठेवून कोरोनाला हद्दपार करायचे आहे आणि ते केवळ नियमांचे पालन करूनच शक्य आहे, असेही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले.

मास्क न वापरणे, दुकानांसंदर्भात असलेल्या नियमांचे उल्लंघन करणे यासाठी दंड आकारण्यात येतो. या दंडाची रक्कमही वाढविण्यात आली आहे. दंड वसूल करणे हा मनपाचा उद्देश नाही. नियमांचे पालन सक्तीने व्हावे, ही त्यामागील भूमिका आहे, असे ते म्हणाले. कुणालाही लक्षणे आढळली तर त्यांनी कुठलीही भीती न बाळगता दवाखान्यात जावे. आपली चाचणी करुन घ्यावी. मनपाच्या नियंत्रण कक्षाला त्याबाबत माहिती द्यावी. प्रत्येकाने असे केले तर कोव्हिडमुळे होणारे मृत्यू आटोक्यात येतील, असेही आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले.