Published On : Mon, Jul 27th, 2020

‘लिटमस टेस्ट’ मध्ये नागपूरकर पास…!

महापौर संदीप जोशी : उद्यापासून लोकप्रतिनिधी करणार जनजागृती

नागपूर : नागपूरकारांच्या एकजुटीला सलाम करतो. जीवनपद्धती बदलण्यासाठी आणि कोरोनासंदर्भात असलेले दिशानिर्देश पाळण्यासाठी महानगरपालिकेने ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले. त्याला नागपूरकरांनी दिलेला प्रतिसाद उत्स्फूर्त असून संकटाविरोधात नागरिकांनी दाखविलेल्या एकजुटीला मी सलाम करतो. पुन्हा लॉकडाऊन लागू नये म्हणून ही ‘लिटमस टेस्ट’ होती. यात नागपूरकर पास झालेत. मी नागपूरकर असल्याचा मला अभिमान आहे, या शब्दात महापौर संदीप जोशी यांनी नागपूरकर कोरोनाविरोधात लढत असलेल्या लढाईचा गौरव केला.

Gold Rate
24 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,23,400 /-
Gold 22 KT ₹ 1,14,800 /-
Silver/Kg ₹ 1,51,600/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महापौर संदीप जोशी यांनी आज जनता कर्फ्यूला मिळत असलेल्या प्रतिसादाची पाहणी करण्यासाठी त्रिमूर्ती नगर, प्रताप नगर, नरेंद्र नगर, मानेवाडा, दिघोरी, केडीके कॉलेज, जगनाडे चौक, नंदनवन, हसनबाग, भांडे प्लॉट, सक्करदरा परिसरात दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत उपमहापौर मनिषा कोठे, स्थायी समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके होते. या भागातील संपूर्ण दुकाने बंद होती. जे नागरिक रस्त्यावर होते त्यांना घरी राहण्याचे आवाहन केले. ज्यांच्याजवळ मास्क नव्हते, त्यांना मास्कचे वाटप केले.

याप्रसंगी बोलताना महापौर संदीप जोशी म्हणाले, लॉकडाऊन होऊ नये, यासाठी नागपूरकरांना आपल्या सवयींमध्ये बदल करावा लागेल. मास्कचा वापर, शारीरिक अंतराचे पालन, सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर या सवयी अंगीकाराव्या लागेल. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. नागपूरकरांनी ठरवले तर हे अशक्य नाही, हे नागपूरकरांनी दोन दिवसात दाखवून दिले. लॉकडाऊन हा अंतिम पर्याय नाही, हे आता नागपूरकरांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे पुढील चार दिवस अशाच पद्धतीने आपली जीवनशैली करण्याचा प्रयत्न नागपूरकरांनी करावा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले.

पुढील चार दिवस जनजागृती
दोन दिवस ‘जनता कर्फ्यू’ यशस्वी केल्यानंतर आता नागपुरातील सर्व खासदार, आमदार, मनपा पदाधिकारी आणि नगरसेवक जनतेत जाऊन कोरोनासंदर्भातील नियम नागरिकांनी पाळावे यासाठी पुढील चार दिवस जनजागृती करणार आहेत. या चार दिवसानंतर नागपुरात लॉकडाऊन करायचे की नाही, हे ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे कडक पालन करावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement