Published On : Tue, Jul 6th, 2021

डेल्टा प्लस वेरीअंटच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोविड त्रिसूत्रीचे पालन करावे -जिल्हाधिकारी

Advertisement

नागपूर : सध्या कोरोनाची लाट ओसरत असल्याचे दिसून येते आहे.मात्र राज्यात कोरोना डेल्टा प्लस वेरीअंट आढळून आला आहे. तरी नागरिकांनी कोविड त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज केले.

कन्हान-कामठी-खापरखेडा-कोराडी-बेसा या ग्रामीण भागात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे यांनी तेथील गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संवाद साधला.

डेल्टा प्लसच्या वेरीअंटमुळे आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याची गरज आहे. निर्बधातील काही अंशी शिथीलतेमुळे कोविड पसरु नये यासाठी ब्रेक द चेन या आदेशाचे पालन करावे, असे श्री. ठाकरे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील नागरीकांनी भिती बाळगण्याचे कारण नसले तरी कोरोना हा आजारच घातक असल्याने प्रत्येक नागरीकाने कोरोना त्रिसुत्रीचे (मास्क वापरणे, सोशल डिस्टीन्सींग पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे) इत्यादींचे कसोशीने पालन करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

आज 16 बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 4 लाख 68 हजार 42 रुग्ण बरे झाले आहे. रूग्ण बरे होण्याचे 98.07 टक्के आहे. कालच्या अहवालानंतर आज 21 नवे कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळले असून शून्य मृत्युची नोंद झाली आहे.

नागरिकांच्या सहकार्यानेच प्रशासन कोविडशी यशस्वी लढा देत आहे. तरी नागरिकांनी निर्बंधांचे पालन करावे. प्रशासन लसीकरण मोहीम युध्दपातळीवर राबवत आहे. लसीकरणासोबत सर्व सुरक्षा नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.