Published On : Tue, Jul 6th, 2021

कुष्ठरूग्ण व क्षयरुग्ण शोध मोहिम यशस्वीपणे राबवा – शिरीष पांडे

नागपूर : जिल्ह्यात कुष्ठरूग्ण व क्षयरुग्ण शोध मोहिम यशस्वीपणे राबवाविण्याचे निर्देश अतिरीक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे यांनी आज दिले.

छत्रपती सभागृहात संयुक्त सक्रीय कुष्ठरूग्ण व क्षयरुग्ण शोध व संनियंत्रण समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हयातील कुष्ठरोग व क्षयरोग रूग्णांचा शोध घेण्यासाठी 1 जुलै 2021 ते 30 मार्च 2022 या कालावधीत शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या सूचनेनुसार कुष्ठरोगांसोबत क्षयरोगाचे सर्वेक्षण करण्यात यावे. त्यासाठी गावपातळीवरील नोंदवहीमध्ये संशयित क्षयरूग्ण नोंदणीसाठी रकाने ठेवण्यात आले आहेत.

याकरीता जिल्हा व ग्रामस्तरावरील आशा व पुरूष स्वयंसेवक व विविध स्तरावरील पर्यवेक्षकांना प्रशिक्षित करा. प्रशिक्षित पथकाव्दारे गृहभेटी देवून रूग्णांचा कायमस्वरूपी रेकॉर्ड तयार करण्याचे श्री. पांडे यांनी सांगितले. शहराच्या अनिर्बंध वाढीमुळे झोपडपट्यांमध्ये व स्थलांतरीत लोकसंख्येपर्यंत क्षयरोग व कुष्ठरोगाबाबत आरोग्यसेवा पुरवण्यासाठी जोखीमग्रस्त प्रभागांमध्ये ही मोहिम राबविण्यात येणार आहे.

या बैठकीला सहायक संचालक कुष्ठरोग भोजराज मडके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ममता सोनसरे, डॉ. एस. एस. मानेकर, डॉ.संजय पुल्लडवार आदी उपस्थित होते.