Published On : Wed, Sep 23rd, 2020

नागरिकांनी पथकातील कोरोनादूतांना सहकार्य करा : सीइओ कुमार अशिर्वाद

Advertisement

– अहेरी तालुक्यातील दुर्गम भागात पथकाबरोबर उपस्थिती

– माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत आढळून आले 97 आयएलआय व सारीचे रूग्ण

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव अंतर्गत नवेगाव उपकेंद्रातील किष्टापुरला मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांनी भेट दिली व काही नागरिकांची प्रत्यक्ष तपासणी सुद्धा केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना पथकातील कोरोनादूतांना सहकार्य करा असे आवाहन केले. नागरिकांच्या आरोग्यासाठी, त्यांना कोरोना होवू नये म्हणून हे कोरोनादूत आपल्या दारात येत आहेत. त्यांना योग्य माहिती देवून कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी प्रशासनाला मदत करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वत: जावून आरोग्य कर्मचारी यांचेबरोबर गृहभेटी दिल्या. यामुळे नक्कीच आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचावले. यावेळी त्यांच्या बरोबर आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक व आशा, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

आजपर्यंत जिल्हयात 668 पथकांनी 11558 कुटुंबापर्यंत पोहचून 40851 नागरिकांची तपासणी केली व त्यांना आरोग्य विषयक शिक्षण दिले. *जिल्हयात मोठया संख्येने आशा या मोहिमेत सहभागी आहेत*. राज्य शासनाची महत्वाची मोहिम म्हणून याकडे पाहिले जाते. यात स्थानिक स्वयंसेवकांसह आशा, आंगणवाडी सेविका तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी काम करत आहेत. जिल्हयात 40851 नागरिकांच्या तपासणी नंतर समोर आलेल्या 97 आयएलआय व सारीच्या लोकांची कोरोना चाचणी केली जात आहे. अशाच प्रकारे प्रत्येक नागरिकाची तपासणी करून वेळेतच संबंधितांना उपचार सेवा दिली जाणार आहे.

सद्यस्थितीत जिल्हयात लॉकडाऊन राहिले नाही, बहुतांश नागरिक काळजी न घेता वावरत आहे. मास्क न लावणे, सामाजिक अंतराचे पालन न करणे, हात वारंवार स्वच्छ न धुणे या नियमांचे पालन न केल्यामुळे कोरोनचा प्रादुर्भाव लक्षणीय वाढत आहे. मृत्युसाठी तर वयाचे बंधनसुध्दा राहिले नाही. आपली जबाबदारी ओळखून किमान स्वत:साठी व आपल्या कुटुंबासाठी कोणतीही माहिती लपवू नका असे आवाहन त्यांनी कले. घरात को-मॉरबीड नागरिक असेल किंवा एखाद्याला आयएलआय, सारी आणि कोरोनासदृश्य लक्षणे असलीत तर त्याची माहिती पथकाला द्या. जेणेकरून मृत्युदर कमी करण्यात यश येईल.

आपण माहिती लपविली तर आपल्याच कुटुंबाचे नुकसान होणार आहे, याची जाणीव ठेवा. ही मोहीम यशस्वी करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे मोहिमेच्या यशस्वीतेकरीता प्रत्येकाने यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. वारंवार हात स्वच्छ धुणे, मास्कचा वापर करणे आणि सामाजिक अंतराचे पालन करणे, हीच सध्या कोरोनावर मुख्य औषध आहे. सर्व्हेक्षण करतांना आयएलआय, सारी, को-मॉरबीड नागरिकांचा डाटा व्यवस्थित भरा असे त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले.