नागपूर : दोन गटात सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान गुरुवारी मध्यरात्री एका तरुणाच्या सिनेस्टाईल हत्येच्या प्रयत्नात झाले. एका गटाने पिस्तूल चॉपर आणि रॉड घेऊन तरुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या गटातील महिला वेळीच त्याच्या मदतीला धावल्याने तो बचावला.
गुरुवारी रात्री उशीरा ही घटना बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. हाती आलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर परिसरात राहणाऱ्या तरुणांच्या दोन गटात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. त्यांच्यात अधून मधून हाणामारी आणि बाचाबाचीही होत असते.
आज रात्री १० ते ११ च्या सुमारास तरुणाला एकटे पाहून दुसऱ्या गटातील तरुणांनी चॉपर, पिस्तूल आणि रॉड तसेच लाठी घेऊन त्याला घेरले. ते त्याच्यावर हल्ला चढविण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याच्या मदतीला त्याच्या गटातील महिला धावल्या. त्यांनी त्याला सुरक्षित ठिकाणी नेले. हल्ल्यात त्याला दुखापत झाली. मात्र तो बचावला. विशेष म्हणजे, या हल्ल्यात काही महिलांचाही सहभाग असल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच बजाज नगर ठाण्याचे पोलिस पथक तिकडे धावले. तोपर्यंत त्या भागात स्फोटक स्थिती होती.
पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन मध्यरात्री ठाण्यात आणले. आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यातून घटनाक्रम जाणून घेण्याचा पोलीस प्रयत्न करीत होते. या घटनेची माहिती कळताच अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी बजाजनगर ठाण्यात पोहोचले. शुक्रवारी पहाटे दीड वाजेपर्यंत या घटनेची माहिती जाणून घेण्याचा पोलीस अधिकारी प्रयत्न करीत होते.