Published On : Fri, May 15th, 2020

नागपुरात पावणेदोनशे लिटर हातभट्टीची दारू जप्त

नागपूर : दुचाकीवर गावठी दारूची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला तहसील पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली. त्याच्याकडून पावणे दोनशे लिटर गावठी दारू तसेच अ‍ॅक्टिव्हा जप्त करण्यात आली.

मोहम्मद असगर मोहम्मद अकबर (वय ३७) असे आरोपीचे नाव असून तो शांतिनगरात राहतो. तहसील पोलिसांचे पथक गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास पिवळी मारबत चौकाजवळ गस्त करीत असताना त्यांना दुचाकीवर बोरी लादून जात असलेला आरोपी असगर दिसला. त्यांनी त्याला थांबवून त्याच्या जवळच्या बोऱ्या उघडून बघितल्या असता त्यात रबरी ट्यूबमध्ये हातभट्टीची १८० लिटर दारू आढळली. शांतिनगरातून तहसील पोलिस ठाण्याच्या विविध भागात या दारूचा तो पुरवठा करायला निघाला होता. पोलिसांनी त्यांना अटक करून दारू तसेच त्याच्याजवळची दुचाकी असा एकूण ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

ठाणेदार जयेश भंडारकर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक दिलीप सागर, उपनिरीक्षक स्वप्नील वाघ, हवालदार प्रमोद शनिवारी, शिपाई शंभूसिंग किरार, कृष्णा चव्हाण आणि सुरज ठाकूर यांनी ही कारवाई केली.