Published On : Fri, Feb 12th, 2021

चोकेज दुरुस्तीची कामे पूर्ववत आरोग्य विभागाकडे सोपवावी – स्थायी समिती बैठकीत सभापती विजय झलके यांचे निर्देश

नागपूर : सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाकडे (PHE) चोकेज दुरुस्तीची कामे दिली आहेत. परंतु चोकेज दुरुस्तीसाठी लागणारा प्रशीक्षीत कर्मचारी वर्ग आरोग्य विभागाकडे (स्वच्छता) आहे. दोन्ही विभागात समन्वय नसल्याने चोकेजबाबत तक्रारी वाढल्या आहेत. तसेच या विभागात कार्यरत उपअभियंत्याकडे पूरेसे काम नाही. या उलट अन्य विभागात व झोनमध्ये अभियंत्याची कमतरता असून कामाचा व्याप आहे.

त्यामुळे सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागातील (PHE) उपअभियंत्यांना म.न.पा.च्या इतर विभाग व झोनमध्ये आवश्यकता असल्यामुळे त्यांची त्वरित बदली करण्यात यावी व चोकेज दुरुस्तीची कामे (PHE) विभाग पूर्वी प्रमाणेच आरोग्य विभागाकडे देण्यात यावी, असे निर्देश स्थायी समिती सभापती श्री. विजय झलके यांनी आज (११ फेब्रुवारी) रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत दिले.

यावेळी सभापतींनी सर्व झोनचे कार्य. अभियंता व सहा.आयुक्त यांचेसह आरोग्याधिकारी तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार यांचे अभिप्राय जाणून घेतले. त्यावेळी सर्वांनी हे काम पूर्वी प्रमाणे आरोग्य विभागाकडे (घनकचरा व्यवस्थापन) ठेवणे उचित होईल असे सांगितले. आरोग्याधिकारी यांनी त्यांचेकडील आरोग्य विभागाचा कर्मचारी या कामी उपलब्ध करुन देण्याचे मान्य केले. तथापी तांत्रिक स्वरुपाची कामे सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाकडूनच करुन घेणे उचित राहील, असेही सांगितले.


बैठकीत दिव्यांग बांधवाना ट्रायसायकल देण्याबाबत चर्चा करण्यात येवून याबाबत ट्रायसिकल देण्याबाबत निर्णय घेण्यात यावा तसेच गरजू महिलांना सिलाई मशिन देण्याच्या संदर्भात तात्काळ निर्णय घेण्यात यावा, असेही स्थायी समिती सभापतींनी निर्देश दिलेत.

यावेळी स्थायी समिती सदस्यासह अति.आयुक्त श्री. जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त श्री. निर्भय जैन, राजेश भगत, रविन्द्र भेलावे व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.