Published On : Mon, May 5th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात चिमुकलीचे अपहरण; पोलिसांनी ४५ मिनिटांत केली सुटका, आरोपीला अटक

Advertisement

नागपूर: एका कुख्यात गुन्हेगाराने आपल्या परिचित महिलेच्या पाच वर्षीय मुलीचे अपहरण करून २० हजार रुपयांची खंडणी मागितली. पोलिसांना माहिती दिल्यास मुलीचा गळा कापण्याची धमकी देण्यात आली. मात्र, पोलिसांनी अवघ्या ४५ मिनिटांत अतिशय शिताफीने ही चिमुकली सुखरूप सोडवून आरोपीला अटक केली. हा प्रकार वर्धा मार्गावर घडला असून बेलतरोडी पोलिसांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

अपहरण आणि खंडणीची मागणी-
सूर्या उर्फ मिलिंद बघेल (वय २९, रा. बुटीबोरी) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे. तो कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात हिंगणा पोलीस ठाण्यात खुनासह अन्य गंभीर गुन्हे दाखल आहेत. अपहरण झालेल्या चिमुकलीची आई आरोपीच्या ओळखीची होती. आपल्या व्यसनांसाठी पैशांची गरज असल्याने त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

Gold Rate
05 May 2025
Gold 24 KT 93,900/-
Gold 22 KT 87,300/-
Silver/Kg 95,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही महिला आपल्या मुलांसह वर्धा मार्गावरील तृप्ती हॉटेलजवळ बसची वाट पाहत होती. यावेळी सूर्या अचानक एका खाजगी ऑटोने तेथे पोहोचला आणि मुलीला जबरदस्तीने उचलून घेऊन फरार झाला. काही वेळानंतर त्याने महिलेच्या मोबाईलवर फोन करून २० हजार रुपयांची खंडणी मागितली. पोलिसांना माहिती दिल्यास मुलीचा जीव घेण्याची धमकी त्याने दिली.

पोलीस तपास आणि आरोपीचा शोध-
अपहरणामुळे घाबरलेल्या महिलेने तातडीने बेलतरोडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. ठाणेदार मुकुंद कवाडे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तातडीने तपास पथकांना सूचना दिल्या. अपहरण झालेल्या मुलीला स्पष्ट बोलता येत नसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अधिक सावधगिरी बाळगली. आरोपी सूर्या हा धोकादायक असल्याने पोलिसांनी सिव्हिल ड्रेसमध्येच तपास करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, एका पोलिसाने नातेवाईक असल्याचे सांगून आरोपीशी संपर्क साधला आणि १० हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली. आरोपीने डोंगरगावजवळ येण्यास सांगितले, मात्र त्याला संशय आल्याने त्याने मोबाईल बंद केला. पोलिसांनी तांत्रिक मदतीने त्याच्या मोबाईलचे लोकेशन शोधले असता तो बुटीबोरी परिसरात असल्याचे आढळले.

४५ मिनिटांत यशस्वी सुटका-
पोलिसांचे तीन पथक त्या भागात सक्रिय होते. अचानक सर्व्हिस रोडवर निळ्या फ्रॉकमधील एका चिमुकलीसोबत एक व्यक्ती चालताना दिसला. अपहरण झालेल्या मुलीनेही निळा फ्रॉक घातल्याने पोलिसांनी त्याला अडवून विचारणा केली. सुरुवातीला त्याने खोटे नाव सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी तातडीने चिमुकलीला सुखरूप तिच्या आईच्या स्वाधीन केले आणि सूर्या बघेलला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. अवघ्या ४५ मिनिटांत पोलिसांनी हे प्रकरण सोडवले. ठाणेदार मुकुंद कवाडे, श्रीकांत गोरडे, नारायण घोडके, मनोज गबने, विवेक श्रीपाद, सचिन देव्हारे, अतुल माने आणि अंकुश चौधरी यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

तत्पर पोलिसी कारवाईने टळला अनर्थ-
नागपुरात याआधीही बालकांच्या अपहरणानंतर हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी कोणतीही जोखीम न घेता अत्यंत संयमाने आणि रणनीतीने कारवाई केली. जर आरोपीला संशय आला असता, तर त्याने चिमुकलीचा जीवही घेतला असता. पोलिसांनी थेट संपर्क टाळत महिलेच्या मोबाईलवरून आरोपीशी संवाद साधला. या चलाखीमुळे मोठा अनर्थ टळला आणि अपहरणकर्त्याला अवघ्या काही मिनिटांत गजाआड करण्यात आले.

ही यशस्वी पोलिसी कारवाई नागपूर पोलिसांच्या सतर्कतेचे आणि तांत्रिक कौशल्याचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

Advertisement
Advertisement