Published On : Mon, Dec 2nd, 2019

मुख्यमंत्री सहायता निधीचे नागपूर कार्यालय सुरु करा

Advertisement

– चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी
– विदर्भातील दुर्धर आजाराचे रुग्ण उपचारापासून वंचित

नागपूर: समाजातील दुर्धर आजाराच्या गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीचे कार्यालय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात सुरु केले होते. हैद्राबाद हाऊस येथे हे कार्यालय सुरु होते. हे कार्यालय नव्या शासनाने बंद केल्यामुळे विदर्भातील दुर्धर आजाराचे रुग्ण शासकीय मदतीपासून वंचित झाले आहे. हे कार्यालय त्वरित सुरु करण्याची मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर मंत्रालयीन अधिकार्‍यांच्या आदेशान्वये नागपूरचे कार्यालय बंद करण्यात आले.

मुख्यमंत्री सहायता निधीच्या या कार्यालयामार्फत विदर्भात हजारो रुग्णांना आर्थिक साहाय्य दिले जात होते. हैद्राबाद हाऊस येथील कार्यालयात रुग्णांचे प्रस्ताव दिले जात होते. या प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी एका समितीचे गठन करण्यात आले होते. या समितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मेयोचे अधिष्ठाता, सिव्हिल सर्जन, आरोग्य उपसंचालक, डागा रुग्णालयाचे अधीक्षक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा समावेश होता. या समितीने रुग्णाचे मदतीचे प्रस्ताव मंजूर केल्यानंतर ते मुंबईला मंत्रालयात पाठविले जात होते. जे प्रस्ताव महात्मा फुले जनआरोग्य योजनेकडे पाठवून त्यामार्फत किंवा मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णाला उपचारासाठी मदत दिली जात होती. हे कार्यालयच बंद झाल्यामुळे रुग्णांना उपचार मिळेनासे होत असून आता रुग्णांना थेट मुंबई गाठावी लागते. मुंबई येथे मंत्रालयात रुग्णांचे उपचाराचे प्रस्ताव धूळ खात पडून आहेत.

रुग्णांकडून आलेल्या अर्जांना मंजुरी देण्यासाठी डॉक्टरांच्या या समितीची दर आठवड्याला मंगळवारी बैठक होत होती. या बैठकीत अर्जांनी मंजुरी देणे किंवा नामंजूर करणे अशी कारवाई केली जात होती. दर आठवड्याला 70 ते 100 अर्ज- उपचाराचे प्रस्ताव या समितीसमोर येत होते. महिन्याला सुमारे 250 उपचार प्रस्ताव ही समिती मुंबईला पाठवीत होती व रुग्णांना त्यातून मदत दिली जात होती. मुख्यमंत्री सहायता निधीतून कोणत्याही रुग्णालयात उपचार घेतल्यास त्याचे बिल मिळत होते. पण महात्मा फुले जीवनदायी योजनेमार्फत उपचारासाठी या योजनेच्या पॅनेलवर असलेल्या दवाखान्यांमध्येच उपचार मिळतात. नागपूरचे या मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयात विदर्भातील सर्व जिल्ह्यातून अर्ज येत होते. आता विदर्भातील रुग्णांच्या नातेवाईकांना मुंबईचे खेटे घालावे लागत आहेत, याकडेही माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष वेधून नागपूरचे हे कार्यालय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्वरित सुरु करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.