नागपूर – नागपूर येथील रामगिरी निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘गोरेवाडा स्थानिक जैवविविधता उद्यान, निसर्ग संपर्क आणि अनुभव केंद्र’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या सादरीकरणासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्यानाच्या बांधकामासाठी लागणाऱ्या निधीबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यांनी स्पष्ट केले की या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला निधी सरकारकडून आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत खासगी क्षेत्राकडून मिळवण्यात येईल.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, समाजातील प्रत्येक घटकात निसर्ग संवर्धनाची भावना निर्माण व्हावी, यासाठी निसर्गाच्या माध्यमातून लोकांपर्यंत सकारात्मक संदेश पोहोचवणे आवश्यक आहे. नागपूरमधील गोरेवाडा परिसरात सुमारे ३ लाख चौरस मीटर क्षेत्रात प्रस्तावित हे जैवविविधता उद्यान त्या दृष्टीने एक उत्तम माध्यम ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्यानाच्या तीन प्रमुख संकल्पना : पर्यावरण संवर्धन, शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभव
या जैवविविधता उद्यानाची उभारणी पर्यावरण संरक्षण, शैक्षणिक प्रबोधन आणि प्रत्यक्ष अनुभव या तीन प्रमुख संकल्पनांवर आधारित असेल. कृषी, विज्ञान, वनीकरण आणि जैवविविधता क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे उद्यान एक संशोधन व ज्ञानकेंद्र ठरेल.
उद्यानातील वैशिष्ट्यपूर्ण घटक :
१५० पेक्षा अधिक बांबूच्या जातींची लागवड स्थानिक मातीसाठी योग्य झाडांची निवड व लागवड देवराई वन, नक्षत्र वन, राशी वन औषधी वनस्पती संशोधन व संवर्धन केंद्र फुलपाखरू आणि काजवे वन मृदा विविधता संवर्धन हॉल पावसाचे मापन केंद्र, दिशा विज्ञान विभाग
योग व शांतता क्षेत्र या जैवविविधता उद्यानाच्या माध्यमातून पर्यावरणाबद्दलची जाणीव वाढेल आणि नागपूर शहराला एक नवे शैक्षणिक व निसर्गपर्यटन केंद्र मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.