Published On : Wed, Jul 18th, 2018

औरंगाबाद शहरातील कचरा प्रश्न सोडविण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नागपूर: औरंगाबाद शहरातील कचरा प्रश्न सोडविण्यासाठी कालबद्ध नियोजन करावे. त्यासाठी राज्य शासन योग्य ते सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

औरंगाबादमधील कचराप्रश्नी आज विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत विधानभवनात बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कचरा व्यवस्थापन करण्याच्या सूचना देऊन वेळेत कार्यवाही न केल्यास सक्त कारवाई करणार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, औरंगाबादमधील कचरा व्यवस्थापनासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करणार आहे. शहरातील कचरा व्यवस्थापनाबरोबरच पाणी व रस्त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे. कचरा विघटनासाठी यंत्रणा उभारण्यासाठी पारदर्शक व कालबद्ध पद्धत वापरण्यात यावी.

महानगरपालिकेच्या वतीने कचरा विघटनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती यावेळी देण्यात आली. आमदार इम्तियाज जलील, अतुल सावे, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका आयुक्त निपुण विनायक आदी यावेळी उपस्थित होते.