Published On : Wed, Feb 7th, 2018

स्वारगेट इंटिग्रेटेड मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट हब आराखड्याच्या कामाचे नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Advertisement

मुंबई : पुण्यातील स्वारगेट येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या इंटिग्रेटेड मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट हबच्या आराखड्याचे सादरीकरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर झाले. महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन व महाराष्ट्र रस्ते परिवहन महामंडळाने या प्रकल्प आराखड्याच्या कामाचे नियोजन करावे, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

मंत्रालयात झालेल्या स्वारगेट इंटिग्रेटेड मल्टिमॉ़डेल ट्रान्स्पोर्ट हबच्या आराखडा सादरीकरणास नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, रामनाथ सुब्रम्हण्यम, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल तेली-उगले, संकल्प डिझाईनचे शितेश अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते.

या ट्रान्स्पोर्ट हबच्या आराखड्यासंदर्भात यावेळी मुख्यमंत्र्यांनी काही सूचना दिल्या. तसेच या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी महामेट्रो व एसटी महामंडळ यांनी संयुक्तपणे हा प्रकल्पाचे काम करावे, असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

स्वारगेट येथील मेट्रो स्थानक, एसटी महामंडळाचे बस स्टँड, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे बसस्थानक आदी एकत्र आहेत. यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्यासाठी इंटिग्रेटेड मल्टिमॉ़डेल ट्रान्स्पोर्ट हब उभारण्यात येणार आहे. दोन टप्प्यात होणाऱ्या या हबच्या कामात पहिल्या टप्प्यात मेट्रो स्थानक व पीएमपीएमएल बस स्थानक विकसित करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात एसटी बस स्थानक विकसित करण्यात येणार आहे. बस टर्मिनल, भुयारी पादचारी मार्ग, थिएटर, कार्यालये व वाणिजिक वापरासाठीची इमारत, रिक्षा व टॅक्सी स्टँड आदींची सुविधा असणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.