Published On : Sun, Apr 29th, 2018

व्हिडिओ: नागपुरात नंदनवन येथे हवालाचे 4 कोटी जप्त, कार मध्ये लपवली होती रक्कम


नागपूर : नंदनवन पोलिसांनी रविवारी मध्यरात्री २.३० च्या सुमारास एका डस्टर कारमधून ३ कोटी २२ लाखांची रोकड जप्त केली. रायपूरहून (छत्तीसगड) एका सराफा व्यावसायिकानं ही रोकड नागपुरातील व्यावसायिकासाठी पाठवली होती. ही रोकड हवालाची असावी, असा संशय आहे.

एमएच ३१/ एफए ४६११ क्रमांकाच्या डस्टर कारमधून हवालाची कोट्यवधींची रोकड छत्तीसगडमधून नागपुरात येत असल्याची माहिती नंदनवन पोलिसांना मिळाली. त्यावरून रात्रपाळीत असलेले एपीआय सोनवणे आणि पीएसआय सोनुले यांनी पारडी मार्गावरील प्रजापती चौकात सापळा लावून या कारला थांबवले. कारमध्ये राजेश वामनराव मेंढे (वय ४०, रा. मिनीमातानगर, कळमना) आणि नवनीत गुलाबचंद जैन (वय २९ रा. शांतीनगर, तुलसीनगर जैन मंदीराजवळ) हे दोघे होते. आम्ही कारचे चालक आहोत आणि ही कार वर्धमाननगरातील प्रशांत केसानी नामक व्यापाऱ्याकडे घेऊन जात असल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांनी केसानीला फोन लावून कारमध्ये काय आहे, अशी विचारणा करुन त्याला नंदनवन पोलीस ठाण्यात येण्यास सांगितलं. मात्र, केसानीनं पोलिसांशी बोलणं टाळण्याचा प्रयत्न केला.

खबऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कारची कसून तपासणी केली असता डिक्की आणि चारही सीटच्या पायदानाजवळ विशिष्ट कप्पे (लॉकर) तयार करण्यात आल्याचं पोलिसांना दिसले. ते कुलूपबंद होते. त्यामुळे पोलिसांनी वाहनचालक मेंढे आणि जैनला चावी मागितली असता, त्यांनी ती केसानीकडे असल्याचे सांगितले. केसानी प्रतिसाद देत नव्हता. नंतर त्याच्या वतीनं मनिष खंडेलवाल पोलीस ठाण्यात आला. बरेच आढेवेढे घेतल्यानंतर त्याने नंतर सकाळी ७ वाजता लॉकरची चावी उपलब्ध करून दिली. पोलिसांनी लॉकर उघडले असता आतमध्ये २ हजार, ५००, २०० आणि शंभरच्या नोटांची बंडलं दिसली. पोलिसांनी पंचासमक्ष ही रोकड बाहेर काढली. परिमंडळ चारचे उपायुक्त निलेश भरणे यांना ही माहिती कळताच त्यांनी लगेच नंदनवन पोलीस ठाणे गाठलं. त्यांनी पंच आणि व्हिडीओ कॅमेरे बोलवून ही रक्कम मोजून घेतली. त्यासाठी नोटा मोजण्याच्या मशिन्सही मागवण्यात आल्या. या गाडीत एकूण ३ कोटी २२ लाख ७२० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आयटी, इडीला माहिती

पोलीस उपायुक्त भरणे यांनी लगेच प्राप्तिकर विभाग आणि अंमलबजावणी संचलनालयाला याबद्दलची माहिती देऊन दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलवून घेतलं. दरम्यान, ही रोकड मॅपल ज्वेलरी प्रा. लि. रायपूरचे संचालक खजान ठक्कर यांनी रायपुरातून नागपुरात पाठविल्याची प्राथमिक माहिती पुढे आली. प्रशांत केसानी काय करतो, ते स्पष्ट झाले नाही. मात्र, ही रोकड हवालाचीच असावी, अशी जोरदार चर्चा शहरात पसरली होती.