Published On : Mon, Jan 7th, 2019

मुख्यमंत्र्यांनी नयनतारा सहगल यांची क्षमा मागावी व सन्मानाने बोलवावे- नवाब मलिक

Nawab Malik

मुंबई: नयनतारा सहगल यांचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर रद्द करण्यात आलेला आहे. जर तसं नसेल तर राज ठाकरे यांनी मन मोठं करुन क्षमा मागितली तसं मुख्यमंत्र्यांनी मन मोठं करुन नयनतारा सहगल यांची क्षमा मागून त्यांना पुन्हा निमंत्रण दिले पाहिजे. सन्मानाने त्यांना साहित्य संमेलनामध्ये बोलावून घेवून त्यांचं भाषण संमेलनामध्ये झालं पाहिजे. जर असे देवेंद्र फडणवीस करणार नसतील तर यांनीच मोदींच्या भीतीपोटी निमंत्रण रद्द करण्याचे कटकारस्थान केलेले आहे. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा हात आहे असा आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.

गेल्या दोन दिवसापासून अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे यवतमाळमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये साहित्यिका नयनतारा सहगल यांना निमंत्रित करण्यात आले होते. काही स्थानिक मनसेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्यानंतर आयोजकांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो म्हणून तुम्ही येवू नका असे सांगितले. हे कळवल्यानंतर मनसेने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. अशी कोणतीही धमकी देण्यात आलेली नाही.आणि त्याबाबतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी क्षमा मागून पक्षाचा कोणताही विरोध नाही असे स्पष्ट केले आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

एकंदरीत नयनतारा सहगल या नेहरु घराण्याच्या सदस्य आहेत. आमच्या मनात शंका आहे की,मोदी यांच्या मनात नेहरु यांच्याविषयी द्वेष आहे. त्यामुळेच भाजप पक्षाच्या इशाऱ्यावर हे करण्यात आले आहे.जरी मोदीसरकार सांगत असेल की आमचा संबंध नाही. मुख्यमंत्री कार्यालयातून स्पष्टीकरण देण्यात आलेले असले तरी आमचा विश्वास बसत नाही.ज्या पध्दतीने नयनतारा सहगल यांनी पुरस्कार परत करुन पुरस्कार परत करण्याची सुरुवात केली होती. मोदी यांच्या भीतीपोटी मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर त्यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

भाजप सरकारकडून सांगत असले की आमचं काही देणंघेणं नाही.कारण काय दाखवण्यात आले की, नयनतारा आल्या तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. कार्यक्रम लोकं उधळून लावतील. परंतु मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत आणि एखादया साहित्यिकाच्या बोलण्यावर बंदी होत असेल…निमंत्रण रद्द करण्यात येत असेल हे सरकारने काढलेले एक निमित्त आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

या पत्रकार परिषदेला महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रवक्ते संजय तटकरे, क्लाईड क्रास्टो,महेश चव्हाण आदी उपस्थित होते.