Published On : Wed, Mar 7th, 2018

सिडनीत होणाऱ्या जागतिक रोबोटिक्स स्पर्धेसाठी मुंबईच्या संघाला मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Advertisement

मुंबई: जागतिक रोबोटिक्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फर्स्टआर फॅक्टरच्या टीम इंडिया-६०२४ या संघाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व रोबोटिक्स याविषयी जाणीव जागृती निर्माण व्हावी यासाठीच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

मुंबईतील विविध शाळांतील २३ विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आर फॅक्टर कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीची भारतीय संघ म्हणून ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या संघाने आज विधानभवनात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांची भेट घेऊन स्पर्धेची माहिती दिली. संघाचे मार्गदर्शक निलेश शहा यांनी आर फॅक्टरची आणि या जागतिक स्पर्धेची माहिती दिली. या संघाने यापूर्वी झालेल्या वॉशिंग्टनमधील स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविल्याचे सांगितले.

सिडनीमध्ये १३ मार्चपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत जगभरातील तीन हजारांवर संघ सहभागी होणार आहेत. या संघाने स्पर्धेसाठी तयार केलेल्या रोबोटला भारतरत्न माजी राष्ट्रपती दिवंगत ए.पी.जे. कलाम यांच्या स्मृत्यर्थ ‘कलाम’ हे नाव दिले आहे. हा रोबोट स्पर्धेतील वेगवेगळ्या अशा आव्हानात्मक टप्प्यांना सामोरा जाणार आहे.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संघातील विद्यार्थ्याशी तसेच पालकांशी संवाद साधला. रोबोटिक्स हा आगामी युगातील परवलीचा विषय राहणार आहे. त्यामुळे या विषयाची जाणीव जागृती व्हावी. लहान वयातच या विषयाची गोडी लागावी यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. तसेच आर फॅक्टरच्या संघाला सुयशासाठी शुभेच्छा दिल्या.