Published On : Tue, Jan 1st, 2019

हात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळयाचे राजस्थानचे मुख्यमंत्री गहिलोत यांच्या हस्ते 3 जानेवारी रोजी अनावरण

मुख्यमंत्री अशोक गहिलोत यांचा नांदेड येथे भव्य सत्कार

नांदेड: सामाजिक समतेचे जनक व स्त्री शिक्षण उध्दारक महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळयाचा अनावरण सोहळा गुरुवार, दि. 3 जानेवारी रोजी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहेलोत यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचे नांदेडमध्ये आगमन होणार असून त्यानिमित्त त्यांचा भव्य नागरी सत्कार राज्याचे माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात येणार आहे.

मनपा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने प्रसिध्द केलेल्या वचननाम्यामध्ये शहराच्या विविध भागात राष्ट्रीय पुरुषांचे पुतळे उभारण्याचे अभिवचन दिले होते. या अभिवचनाची पूर्ती करत एक महिन्यापूर्वी राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळयाचा लोकार्पण सोहळा कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.

त्यानंतर लगेच नववर्षाच्या प्रारंभीच येथील आयटीआय चौकमध्ये उभारण्यात आलेल्या महात्मा जोतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळयाचा अनावरण सोहळा 3 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता आयोजित केला आहे. हा अनावरण सोहळा राजस्थानचे नवनियुक्त मुख्यमंत्री अशोक गहेलोत यांच्या शुभहस्ते व माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.

मुख्यमंत्री अशोक गहेलोत यांनी पदभार स्विकारल्यानंतर पहिल्यांदाच ते पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमासाठी नांदेडला येत आहेत. या बाबींचे औचित्य साधून नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने येथील नवामोंढा मैदानावर सायंकाळी 6 वाजता त्यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित केला आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण राहणार असून यावेळी गुजरातचे काँग्रेस पक्षाचे प्रभारी खा.राजीव सातव, माजी मंत्री आ. मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार, माजी मंत्री आ.बसवराज पाटील, माजी मंत्री आ. डी. पी. सावंत, माजी मंत्री आ. अमित देशमुख, आ. वसंतराव चव्हाण, आ. सौ. अमिताताई चव्हाण, माजी आ. ईश्वरराव भोसीकर, रोहिदास चव्हाण, हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, माधवराव पाटील जवळगावकर, रावसाहेब अंतापूरकर, जि.प.अध्यक्षा श्रीमती शांताबाई जवळगावकर, महापौर सौ.शिलाताई भवरे यांच्यासह मराठवाडयातील आजी-माजी आमदारांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

तरी या सोहळयास नांदेड जिल्हयातील काँग्रेस कार्यकर्ते व नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर व जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी केले आहे.